‘विकसित भारत जी राम जी 2025’ योजनेचे स्वागत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : एनडीए सरकारने भारत विकसित होण्यासाठी मोठे पाऊल उचलले असून मनरेगा योजनेत काळानुसार बदल केला आहे. हा बदल केलेली योजना ग्रामीण भागातील लोकांचा विकास करण्यास खऱ्या अर्थाने लाभदायक ठरणार आहे. ‘विकसित भारत जी राम जी 2025’ योजनेचे गोमंतकीयांच्या वतीने स्वागत करीत असल्याचे मुख्यामंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. विकसित भारत जी राम जी योजनेखाली 100 दिवसांऐवजी 125 रोजगाराचे दिवस होणार आहेत. मनरेगा योजनेत अनेक चोरवाटा होत्या. त्यामुळे देशभरात 193 कोटी ऊपयांचा गैरव्यवहार झाला होता. गोव्यात मात्र एकही पैशाचा गैरव्यवहार झालेला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत जलस्त्रोत आणि सहकारमंत्री सुभाष शिरोडकर व वीजमंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते. राज्यातील 191 पंचायत आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी या योजनेतील विविध प्रकल्पांबाबत नियोजन करावे. गावागावातील विविध छोटे प्रकल्प या योजने अंतर्गत घेणे शक्य असून त्यासाठी 60 टक्के केंद्र सरकार तर 40 टक्के राज्य सरकारचा पैसा असणार आहे. पंचायतीकडून दिली जाणाऱ्या जॉब कार्डांची तपासणी होणार असून जे पात्र नसतील त्यांना वगळून नव्यांना संधी दिली जाणार आहे. शेतीचे 60 दिवस वगळून 125 दिवस काम दिले जाईल, कारण जे लोक शेतात काम करतात ते अनेकदा जॉब कार्डद्वारे काम करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कामगार मिळत नाही. तसे होऊ नये म्हणून शेतीचे 60 दिवस वगळून जॉब कार्डवर काम दिले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल.
योजनेत बदल हेच परिवर्तन: ढवळीकर
मनरेगा योजनेत अनेक त्रुटी होत्या. कालबाह्य झालेल्या योजनेत बदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत जी राम जी 2025’ ही योजना केली आहे, हेच खरे परिवर्तन आहे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. मनरेगा योजनेत पैसे लोकांपर्यंत जात नव्हते तर ते मधल्यामध्ये गायब होत होते. अनेक कामे न करताच ती केली असे दाखवून पैशांची अफरातफर केली जात होती. आता पैसे थेट खात्यात जाणार असून त्याचा लाभ गोरगरीबांना मिळणार आहे, असेही ढवळीकर म्हणाले.