कृत्रिम बुद्धीमत्तेचे लोकशाहीकरण हवे
एआय अॅक्शन समिट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, रोजगारांवर गदा नाही येणार
वृत्तसंस्था / पॅरीस
भविष्यकाळात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान मानवतेच्या मार्गाची दिशा निश्चित करणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सध्या केवळ प्रारंभ झाला आहे. नजीकच्या भविष्यकाळात हे तंत्रज्ञान आणखी विकसीत होणार आहे. या तंत्रज्ञानावर कोणाचाही एकाधिकार असणार नाही, हे सुनिश्चित केले जाण्याची आवश्यकता आहे. मात्र, या तंत्रज्ञानामुळे रोजगारांवर गदा येईल, अशी समजून चुकीची आहे. हे तंत्रज्ञान नवे रोजगार निर्माणही करु शकते, असे आश्वासक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते मंगळवारी फ्रान्समध्ये ‘एआय अॅक्शन समिट’ किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता कृती परिषदेत भाषण करीत होते. त्यांच्याकडेच या महत्वाच्या जागति परिषदेचे अध्यक्षस्थानही देण्यात आले आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरीस येथील ग्रँड पालासिस या भागात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला जगातील अनेक देशांचे प्रमुख तसेच तंत्रज्ञ उपस्थित आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे उपयोग, मर्यादा, मानवाच्या जीवनातील याचे स्थान, उद्योग-व्यवसायांवर होणारा त्याचा परिणाम आणि त्याच्या नियंत्रणासाठी करावी लागणारी उपाययोजना या सर्व मुद्द्यांवर या शिखर परिषदेत सांगोपांग विचार केला जाणार आहे.
रोजगारासंबंधीची भीती व्यर्थ
कोणतेही नवे तंत्रज्ञान बाजारात आले, की त्यामुळे नोकऱ्या जातील आणि असंख्य लोक बेकार होतील, असा अपप्रचार प्रारंभीच्या काळात केला जातोच. तथापि, आजवर कोणत्याही नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगारांवर गदा आलेली नाही. उलट, रोजगारांच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. असेच कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानासंबंधी घडणार आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आपल्याला नवे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. तसेच नवी कौशल्यक्षमता विकसित करावी लागणार आहे. तसे केल्यास या तंत्रज्ञानाची चिंता करण्याचे कारण उरणार नाही, अशीही मांडणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत आपल्या भाषणात केली.
सावधानता आवश्यक
कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग समाजविरोधी आणि घातक शक्तींकडून केला जातो. तसे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानासंबंधी होऊ न देण्याची आवश्यकता आहे. यासाठी विश्वसमुदायाने एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता आहे. या तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेला धोका पोहचू शकतो. तसेच याचा उपयोग करुन अपप्रचार केला जाऊ शकतो. ‘डीपफेक्स’ सारख्या प्रकारांमधून कोणाचेही प्रतिमा हनन पेले जाऊ शकते. हे रोखण्यासाठी कठोर नियमांचे क्रियान्वयन करण्याची आवश्यकता आहे, असा सावधानतेचा इशाराही त्यांनी भाषणात दिला.
स्थानिक परिस्थितीशी सांधा जुळावा
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा अविश्वसनीय वेगाने विकास आणि विस्तार होत आहे. या तंत्रज्ञानापासून आपण दूर राहू शकत नाही. मात्र, या तंत्रज्ञानाचा संबंध स्थानिक परिस्थितीशी (लोकल इकोसिस्टिम) जोडला जाण्याची आवश्यकता आहे. या तंत्रज्ञानासंबंधी सर्वसामान्यांचे प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास ते अधिक उपयुक्त ठरु शकेल, अशी महत्वाची सूचना त्यांनी केली.
व्यवस्थापन, निकष आवश्यक
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा दुरुपयोग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर या तंत्रज्ञानाचे प्रशासन करण्यासाठी नियम बनविण्याची आवश्यकता आहे. तसेच कठोर निकर्ष निर्माण करुन सर्वांनी या नियमांचे आणि निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी विश्वसमुदायाकडून एकत्रित प्रयत्न व्हावे लागतील. धोके आणि लाभ यांच्यासंबंधी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
भारताकडे प्रचंड प्रज्ञा
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी भारताकडे प्रचंड बौद्धिक प्रज्ञा आहे. भारताने या क्षेत्रात मोठे काम केले असून आम्ही जगाशी आमचा अनुभव आणि कौशल्य वाटून घेण्यासही सज्ज आहोत. या क्षेत्रात भारताची जोमाने प्रगती होत असून तिचे प्रत्यंतर लवकरच येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेच्या उपाध्यक्षांचा पाठिंबा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रंज्ञानाचे जे धोके निदर्शनास आणून दिले आहेत, ते योग्यच असून विश्व समुदायाने त्यांच्यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी याच कार्यक्रमात बोलताना केले आहे. या तंत्रज्ञानावर कोणाचाही एकाधिकार असू नये, या त्यांच्या मतालाही व्हान्स यांनी पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. आम्हा सर्वांना कोणत्याही पक्षपातापासून मुक्त असणारी विदा केंद्रे (डाटा सेंटर्स) स्थापन करावी लागणार आहेत, ज्यांचा सर्वांना उपयोग होईल. काही अतिआक्रमक देश या तंत्रज्ञानाचा उपयोग जगात गोंधळ माजविण्यासाठी, किंवा स्वत:चे वर्चस्व स्थापन करण्यासाठीही करु शकतात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतही योग्य असून चिंतनीय आहे, अशी भलावण व्हान्स यांनी केली आहे.
धोके टाळून लाभ घ्यावा
ड कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानामुळे रोजगार जातील ही चिंता विनाकारण
ड या तंत्रज्ञानातील धोके टाळण्यासाठी जागतिक पातळीवर निकष हवेत
ड या तंत्रज्ञानावर कोणताही देश, संस्था किंवा व्यक्तीचा एकाधिकार नको
ड असा एकाधिकार निर्माण न होण्यासाठी जगाकडून एकत्रित प्रयत्न हवेत