आम्हाला भारताची गरज : क्यूबा
अमेरिकेच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी विनंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील क्यूबाचे राजदूत जुआन कार्लोस मार्सेन एगुइलेरा यांनी व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या सैन्यमोहिमेची निंदा केली आहे. मागील आठवड्यात अमेरिकेने व्हेनेझुएलात सैन्य कारवाई करत अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले हेते. अमेरिकेच्या या कृत्याबद्दल क्यूबाच्या राजदूताने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेला रोखण्यासाठी भारतासारख्या देशांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ग्लोबल साउथचा आवाज मजबूत होऊ शकेल असे त्यांनी म्हटले आहे.
कोणताही एक देश अमेरिकेला अशाप्रकारचे एकतर्फी पाऊल उचलण्यापासून रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने अमेरिकेच्या मूर्खपणाला सामोरे जाण्यासाठी एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे एगुलेइरा यांनी म्हटले आहे. माझ्या विचारात अमेरिकेचे सैन्य आक्रमण व्हेनेझुएलाच्या विरोधात एक गुन्हा आहे. हे एक दहशतवादी कृत्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघ चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या सर्व तत्वांचे उल्लंघन आहे. एका सार्वभौम देशाच्या विरोधात केलेली ही एकतर्फी कारवाई असल्याचा आरोप राजदूताने केला आहे.
अमेरिकेचे निर्बंध, इराणला धमकी आणि सैन्य हल्ल्यांचा उल्लेख करत त्यांनी जागतिक एकतेच्या आवश्यकतेवर जोर दिला. अमेरिकेला रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. हीच एकतेची वेळ आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे जगाला एक धोकादायक संकेत मिळाला असल्याच इशारा क्यूबाच्या राजदूताने दिला आहे.
भारताला आवाहन
भू-राजकीय स्थिती पाहता जगाला भारताची आवश्यकता आहे. भारत एका मोठ्या शक्तीच्या रुपात आवश्यक संतुलन निर्माण करू शकतो आणि सर्व देशांसाठी एक स्थिर भविष्य सुनिश्चित करू शकतो. ग्लोबल साउथचा आवाज म्हणून भारताची भूमिका भविष्यात सातत्याने मजबूत होत जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला भारताची आवश्यकता आहे, जेणेकरू आम्ही जगाला हवे असलेले संतुलन निर्माण करू शकू असे उद्गार त्यांनी काढले आहेत.