‘कॅट’वॉक करणारे कुत्रे
अनेक महिला किंवा पुरुष कॅटवॉक करतात हे आपल्याला माहिती आहे. पण कुत्रेही अशा प्रकारे ‘कॅटवॉक’ करु शकतात, ही माहिती आपल्यापैकी कित्येकांसाठी नवी असू शकेल. अर्थात हे प्रशिक्षित कुत्रे असतात. ते केवळ कॅटवॉक करतान असे नव्हे, तर माणसांसारख्या इतर कसरती आणि करामतीही करु शकतात. नुकतीच रणबीर कपूरचा अॅनिमल नावाचा चित्रपट आलेला आहे. त्यात बॉबी देओल आपल्या डोक्यावर मद्याचा पेला ठेवून नाच करतानाचे एक दृष्य आहे. तशाच प्रकारे कुत्र्यांच्या डोक्यावरही पाण्याने भरलेला ग्लास ठेवून त्यांना कॅटवॉक करायला लावले जाते. अशी कामे कुत्रे आनंदाने करतात का हा प्रश्न असला तरी, ते पाहताना माणसाला आश्चर्य वाटते, हे खरे आहे.
आपले शेजारी राष्ट्र असणाऱ्या नेपाळमध्ये अशा प्रकारचा एक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कुत्र्यांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला पेला ठेवून त्यांना पाण्यातच सोडण्यात आले होते. हे कुत्रे डोक्यावरचा पाण्याचा पेला पडू न देता दिमाखात चालत होते. त्यामुळे उपस्थितांच्या आश्चर्याला पारावार उरला नव्हता. असा कार्यक्रम नेपाळमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आला असल्याने त्याला प्रतिसादही उत्तम मिळाला होता. हा कुत्र्यांच्या अनोख्या कॅटवॉकचे दृष्य चित्रित करुन सोशल मिडियावर दाखविण्यात आले आहे. त्याला आतापर्यंत जगभरातून सहा कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यांच्या कॉमेंटस्मध्ये या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे, तर काहीजणांनी मुक्या प्राण्यांना अशा अनैसर्गिक प्रकारे वागविण्यासाठी टीकाही केली आहे. पण एकंदर, दर्शकांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतल्याचे दिसून येते.