आमच्यात ‘टी-20 विश्वचषक’ जिंकण्याची ताकद : हरमनप्रीत कौर
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 जिंकणे हे संघाचे लक्ष्य आहे. आम्ही एक संघ म्हणून त्यादृष्टीने नेहमीच प्रयत्न करत राहिलेलो आहोत आणि चषक उछालणे हे आमचे प्राथमिक ध्येय राहिलेले आहे, असे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले आहे. निर्भयपणे खेळून आपला ठसा उमटविण्याचे आमचे ध्येय असल्याने आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे सांगून हरमनप्रीतने संघाची महत्त्वाकांक्षा आणि मोहिमेवर भर दिला.
‘आमची अपेक्षा सरळ आहे, देशाला आणि आमच्या समर्थकांना गौरव मिळवून देणे. आम्ही कुठेही खेळलो, तरी ते आम्हाला बिनशर्त पाठिंबा देतात’, असे हरमनप्रीतने म्हटले आहे. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याकडे संघाला त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची आणि जागतिक स्तरावर तऊण व महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंना त्यांचा आवडणारा खेळ खेळण्यास प्रेरित करण्याची संधी म्हणून पाहिले जाते, याकडे तिने लक्ष वेधले.
सदर प्रतिष्ठित चषक जिंकणे हे संघाचे स्वप्न आहे आणि मला विश्वास आहे की, यासाठी आवश्यक क्षमता आमच्याकडे आहे. आम्ही ऑस्ट्रेलियात झालेल्या 2020 च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलो आणि 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत अंतिम फेरी गाठण्याच्या अगदी जवळ आलो होते. यावरून या संघाकडे सर्वांत मोठ्या टप्प्यावर यशस्वी होण्याची ताकद असल्याचे दिसून येते, असे हरमनप्रीत म्हणाली.
प्रथमच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळणार असल्याबद्दलही कौरने उत्साह व्यक्त केला आणि संघ या अनुभवासाठी उत्सुक असल्याचे नमूद केले. ‘मला खात्री आहे की, आम्ही जेव्हा दुबई आणि शारजाहमध्ये खेळू तेव्हा लोक मोठ्या संख्येने सामने पाहण्यासाठी येतील’, असे ती म्हणाली. संघाच्या पदरी भरपूर अनुभव आहे, याकडे तिने लक्ष वेधले. अनेक खेळाडू जागतिक स्तरावरील स्पर्धांत खेळलेले आहेत आणि त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केलेला आहे. अगदी तरुण सदस्यांनी देखील, विशीच्या आरंभीच्या टप्प्यात असूनही, आधीच लक्षणीय अनुभव जमा केलेला आहे, असे मत हरमनप्रीतने व्यक्त केले.
संघातील नवीन चेहरे उत्साह आणि शिकण्याची इच्छा आणतात, ज्यामुळे संघात ऊर्जा वाढते, असे सांगून कौरने संघातील सौहार्द आणि खेळाडूंचा एकमेकांबद्दलचा आदर याचे कौतुक केले. संघातील खेळाडू एकमेकांना समर्थन देतात आणि कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेतात, असेही तिने सांगितले. संघात सकारात्मक वातावरण राखण्याचे श्रेय तिने सपोर्ट स्टाफला दिले. मागील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर लगेच या स्पर्धेची आमची तयारी सुरू झाली होती, असे हरमनप्रीतने स्पष्ट केले.