For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gokul Election | आमचं ठरलंय! गोकुळ'वर महायुतीचाच चेअरमन बसवणार ; Hasan Musrif यांचे सतेज पाटलांना थेट आव्हान!

12:25 PM May 27, 2026 IST | NEETA POTDAR
gokul election   आमचं ठरलंय  गोकुळ वर महायुतीचाच चेअरमन बसवणार   hasan musrif यांचे सतेज पाटलांना थेट आव्हान
Advertisement

                          “गोकुळवर महायुतीचाच चेअरमन बसवणार” – मुश्रीफ

Advertisement

कोल्हापूर :"राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद हे पेल्यातले वादळ होते आणि ते पेल्यातच संपले आहे. पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि नेते एकसंघ असून आगामी सर्व निवडणुका भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे 'महायुती' म्हणूनच लढणार आहेत," अशी स्पष्ट ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. गोकुळ दूध संघाची निवडणूक, हलाल सर्टिफिकेट वाद, सीपीआर केबिन वाद आणि साखर कारखानदारीसमोरील संकटावर त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.

सुनेत्रा पवारांच्या पाठीशी पक्ष ठाम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीविषयी बोलताना मुश्रीफ म्हणाले, "या बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वांनी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील तटकरे यांनी बैठकीत कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही, तर केवळ आपल्याला 'टार्गेट' केले जात असल्याच्या भावना मांडल्या. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा बजेट येणार असल्याने अर्थ खाते नंतर देतो, असे सांगण्यात आले होते; पण ते मिळाले नाही. आज वहिनी दिल्लीत असून, तिथे यावर निश्चित सकारात्मक निर्णय होईल आणि भाजप आमचा योग्य तो सन्मान राखेल." प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा लढवली नव्हती, हे त्याच वेळी सिद्ध झाले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

'गोकुळ'वर महायुतीचाच चेअरमन बसवणार!
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीवर बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक वेळेवर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात लागण्याचा अंदाज आहे. आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, "आमचे मित्र सतेज पाटील म्हणतात की मुश्रीफ यांनी १२ हजार वेळा 'महायुती' शब्दाचा उच्चार केला. पहिल्या टप्प्यात त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण आमचं ठरलंय—आम्ही गोकुळची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार, जिंकणार आणि गोकुळवर महायुतीचाच चेअरमन बसवणार हे फायनल आहे. मतदार यादी अंतिम झाल्याशिवाय जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार नाही."

हलाल सर्टिफिकेटचा वाद राजकीय स्टंट
गोकुळच्या हलाल सर्टिफिकेट वादावर मुश्रीफ यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. "गोकुळ दूध संघातून अझरबैजान आणि आखाती देशांमध्ये तूप, लोणी पाठवले जाते. आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची तांत्रिक गरज असते. हे सर्टिफिकेट २०२२ मध्येच काढलेले आहे आणि नावेद मुश्रीफ तर आता चेअरमन झाले आहेत. आता निवडणूक लागल्यामुळे ज्यांना काही काम नाही, ते अशा गोष्टी उकरून काढून नको ते वाद जोडत आहेत," असा टोला त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज राजकीय कारणासाठी नसून शेतकरी आणि साखर कारखानदारी वाचवण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. "कांदा स्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे साखरेचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे कि, काही कारखानदार आता सामुदायिक आत्महत्येची भाषा करू लागले आहेत. या दौऱ्यात केंद्र सरकारकडून सॉफ्ट लोन, कर्जाचे पुनर्गठन (Restructuring), साखरेचे किमान मूल्य आणि इथेनॉलचे दर वाढवणे यावर सकारात्मक तोडगा निघेल," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीबाबत छगन भुजबळ यांच्या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, कुस्ती खेळण्यापूर्वी पैलवान जसा व्यायाम करतो, तशीच ही पक्षांची तयारी आहे; मात्र प्रत्यक्ष निवडणूक महायुती म्हणूनच लढली जाईल.

सीपीआरमधील केबिन वाद मिटवणार
सीपीआर रुग्णालयातील केबिन वादावर बोलताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे, तोपर्यंत अधिकाऱ्यांनी शांत राहावे. तिथे सिव्हिल सर्जन बसत होते हे खरे असले, तरी ही मालमत्ता आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. मी आणि आमदार प्रकाश आबिटकर एकत्र बसून यावर योग्य तोडगा काढू.

Advertisement
Tags :

.