वकीलविरोधी ‘ते’ न्यायाधीश नकोच!
वकिलांचा एल्गार : न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार : अन्यत्र बदली करण्याचा ठराव
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
वकीलविरोधी भूमिका निभावणाऱ्या तिसरे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात गुरुवारी वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत जोरदार आंदोलन केले. तसेच संबंधित न्यायाधीशांची तातडीने बदली करण्यात यावी, असा ठराव बार असेसिएशनच्या बैठकीत करण्यात आला. ठरावाची प्रत जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि प्रशासकीय न्यायाधीशांना पाठविण्यात आली. इतकेच नव्हे तर जोपर्यंत न्यायाधीशांची बदली होत नाही तोपर्यंत कोणत्याही वकिलाने सदर न्यायालयात सुनावणीसाठी जाऊ नये, असा ठरावही मांडण्यात आला.
याबाबत बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बी. जे. गंगाई यांनी व घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षभरापासून तिसरे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या वागणुकीबाबत वकिलांतून तक्रारी येत आहेत. वकीलवर्गाला असहकार्य करणे, बेताल वक्तव्य करणे, दादागिरीची भाषा वापरणे, अशिलांसमोरच वकिलांचा अपमान करणे आदी प्रकरचे वकीलविरोधी कृत्य त्यांच्याकडून सुरू होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत वकील प्रॅक्टीस करीत होते. पण बुधवारी न्यायाधीशांकडून पुन्हा वकिलांचा अपमान करण्यात आला.
न्यायालयात वकिलांना बसण्यासाठी आरक्षित आसन व्यवस्था असते. त्या ठिकाणी बसलेल्या वकिलांना उठण्यास सांगून प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना न्यायाधीशांनी बसण्यास सांगितले. सदर आसन व्यवस्था वकिलांसाठी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांनाच त्यांनी गप्प केले. त्यामुळे संबंधित वकिलांनी न्यायाधीशांच्या वागणुकीची माहिती बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे न्यायाधीशांच्या वकीलविरोधी भूमिकेविरोधात गुरुवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसरे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात जाऊन न्यायाधीशांना जाब विचारण्यात आला. यावेळी उपस्थित वकिलांनी न्यायाधीशांविरोधात रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली. सकाळपासून दुपारपर्यंत वकिलांनी न्यायालय आवारात मोठी गर्दी केली. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, मार्केटचे साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक, पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.
लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बी. जे. गंगाई यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात वकिलांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत न्यायाधीशांची तातडीने बदली करण्यात यावी, असा ठराव करून सदर प्रत जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि प्रशासकीय न्यायाधीशांना पाठविण्यात आली. इतकेच नव्हे तर जोपर्यंत संबंधित न्यायाधीशांची बदली होत नाही तोपर्यंत तिसरे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात वकिलांनी कोणत्याही सुनावणीसाठी जाऊ नये, असा ठराव करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.