हिंदूंच्या नरसंहाराची पुनरावृत्ती नको
अमेरिकेच्या खासदाराची बांगलादेशवर कारवाईची मागणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी बांगलादेशात हिंदू आणि अन्य धार्मिक अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ऑगस्ट 2024 मध्ये पद सोडल्यावर अल्पसंख्याकांवरील हिंसेच्या घटना वेगाने वाढल्या आहेत असे कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात म्हटले आहे. बांगलादेशात हिंदू आणि अन्य धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधात होत असलेली हिंसा आणि शोषणाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी मी उभा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान 1971 मध्ये एका अनुमानानुसार 30 लाख लोक मारले गेले होते, यातील बहुतांश हिंदूधर्मीय होते. आजही बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, हिंदूंची घरे आणि व्यवसाय नष्ट केले आहेत, त्यांच्या मंदिरांना नुकसान पोहोचविले जात असल्याचे कृष्णमूर्ती यांनी नमूद केले.
केवळ ऑगस्ट महिन्यातच हिंदूंवर 2000 हून अधिक हल्ले झाले. याप्रकरणी मी अमेरिकेच्या विदेश विभागाशी बोललो आहे, तसेच सिनेटच्या सुनावणीत कारवाईची मागणी केली आहे. परंतु याप्रकरणी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आम्ही 1971 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देऊ शकत नसल्याचे कृष्णमूर्ती म्हणाले.
आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर तत्काळ कारवाईची गरज आहे. बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत. या अत्याचारांप्रकरणी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप करण्यात यावा असे कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे.
हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले
बागंलादेशात 25 ऑक्टोबर रोजी चिन्मय कृष्ण दास यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजावर भगवा झेंडा फडकविल्याचा आरोप करत देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना 25 नोव्हेंबर रोजी अटक झाली, ज्यानंतर निदर्शक आणि पोलिसांदरम्यान झटापट झाली होती. 27 नोव्हेंबर रोजी चितगाव न्यायालयाबाहेर झालेल्या झटापटीत एका वकिलाचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी हिंदूधर्मीयांना अटक करण्यास सुरुवात केल्यावर स्थिती बिघडली. इस्कॉनच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच समाजकंटकांनी बांगलादेशातील हिंदूंची घरे अन् मंदिरांना लक्ष्य केले आहे.