For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये ‘कट्टा’ सरकार नकोच

06:19 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये ‘कट्टा’ सरकार नकोच
Advertisement

पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर प्रहार,राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ सीतामढी (बिहार)

बिहारच्या मतदाराला आता पुन्हा कधीच ‘कट्टा’ सरकार नको आहे. ही विधानसभा निवडणूक बिहारच्या जनतेचे भवितव्य निर्धारित करणारी आहे. बिहारच्या मुलामुलींचे भविष्य या निवडणुकीवर निर्भर आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा घसघशीत बहुतम मिळवून यशस्वी होईल, असा माझा विश्वास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सीतामढी येथील विराट प्रचारसभेत केले आहे. ही माझी या निवडणुकीतील प्रचाराची अखेरची सभा आहे. आता मी मतगणनेनंतर राज्यात पुन्हा येईन. बिहारची जनता विकासालाच समर्थन देईल, अशी शाश्वती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

‘नही चाहिये कट्टा सरकार, फिर एक बार एडीए सरकार’ अशी घोषणाही त्यांनी मतदारांना दिली. विरोधी पक्ष या राज्यात सत्तेवर होते, तेव्हा त्यांनी राज्याचे दिवाळे वाजविले. ते पुन्हा सत्तेवर येतील तर मुलांच्या हाती पिस्तुले देतील. आम्ही मुलांच्या हाती लॅपटॉप देत आहोत. आमचा विश्वास विकासावर आहे. तर विरोधकांचा विश्वास अराजकावर आहे, अशा अर्थाची टीकाही त्यांनी सभेत केली.

खंडणीखोर की डॉक्टर

बिहारच्या युवकांनी आणि युवतींनी डॉक्टर व्हावे, की खंडणीखोर व्हावे, हे त्यांच्या मातापित्यांना ठरवावे लागणार आहे. आम्ही राज्यातील युवकांना उच्चशिक्षित आणि उत्तम नागरीक बनविण्याचा प्रयत्न गेल्या 20 वर्षांपासून केला आहे. याची नोंद राज्यातील मतदारांनी घेतली आहे. बंदुक संस्कृती, क्रूरता, द्वेष, कुसंस्कार आणि भ्रष्टाचार याखेरीज अन्य कशाची अपेक्षा विरोधकांकडून करता येत नाही. अशा विरोधकांना सत्तेवर आणण्याची चूक बिहारचा सूज्ञ मतदार कधीच करणार नाही, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात व्यक्त केला.

विरोधकांच्या काळात उद्योगांचा विनाश

1990 ते 2005 या पंधरा वर्षांच्या काळात बिहारमध्ये विरोधकांची सत्ता होती. या प्रदीर्घ काळात राज्यात एकही नवे उत्पादनकेंद्र स्थापन झाले नाही. उलट, मिथिला येथे जे कारखाने आणि गिरण्या होत्या, त्याही याच काळात बंद पडल्या. त्यामुळे बिहारच्या युवकाला अन्यत्र भटकंती करुन रोजगार मिळवावा लागला. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या परिस्थितीत बरीच सुधारणा केली आहे. विकासाची ही गंगा अशीच पुढे न्यायची असेल, तर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार यावे लागणार आहे. मतदारांना याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी याच आघाडीला पुन्हा सत्ता देण्याचा निश्चय केला आहे. प्रथम टप्प्यातील मतदानातून त्यातून चित्र स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सीतामातेच्या आशीर्वादाने...

ही सीतामातेची भूमी आहे. तिच्याच आशीर्वादाने बिहारचा सर्वांगीण विकास होत आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही राज्याची परिस्थिती खूपच सुधारली. आता गुंतवणूकदार या राज्यात मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचा विकास करुन आम्ही ही अनुकूलता निर्माण केली आहे. आता घड्याळाचे काटे मागे फिरता कामा नयेत. ज्यांनी ‘जंगलराज’ आणले, ते आता विकासाची बनावट भाषा बोलत आहेत. मतदार त्यांच्यापासून सावध राहतील आणि मतदान विचारपूर्वक करतील असा विश्वास त्यांनी सभेत व्यक्त केला.

65 व्होल्टचा झटका...

मतदानाच्या प्रथम टप्प्यात 65 टक्के इतके भरघोस मतदान झाले आहे. हाच कल द्वितीय टप्प्यातही राहणार, हे निश्चित आहे. मतदारांनी विरोधकांना 65 व्होल्टस्चा झटका द्यायचा निर्धार केला आहे. या झटक्यासमोर विरोधक टिकू शकणार नाहीत, अशीही खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

बिहारचे मतदार अतिशय सूज्ञ...

ड सीतामढी येथील विराट सभेत पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर घणाघात

ड मतदानाच्या प्रथम टप्प्यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय निश्चित

ड बिहारमध्ये आज आमच्या प्रयत्नांमुळे गुंतवणुकीसाठी अतिपोषक परिस्थिती

ड बिहारच्या परंपरा आणि संस्कृतीच्या संवर्धनासह विकास हेच आमचे ध्येय

Advertisement
Tags :

.