जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कृत्याचा निषेध
चौकशीसाठी बोलाविणे गैर : इंडियन न्यूजपेपर सोसायटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर पोलिसांकडून पत्रकारांना लेखी समन्सशिवाय चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. तसेच पोलिसांकडून या चौकशीमागील कारणही संबंधित पत्रकारांना देण्यात आले नव्हते. या घटनेचा आता इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस)वतीने आयएनएसचे अध्यक्ष विवेक गुप्ता यांनी निषेध नोंदविला आहे. कायदेशीर प्रक्रिया बाजूला सारून अशाप्रकारची कारवाई अस्वीकारार्ह आणि प्रसारमाध्यमांमध्ये दहशत निर्माण करण्यासारखा प्रकार असल्याचे आयएनएसकडून म्हटले गेले आहे.
दैनंदिन, तथ्यआधारित वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चौकशीसाठी बोलाविण्याचा प्रकार केवळ घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कमी लेखणारा नसून स्वतंत्र प्रसारमाध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आहे. सशक्त लोकशाहीसाठी मुक्त अन् भयरहित प्रसारमाध्यमे हा पाया ठरत असतात. कायदा-सुव्यवस्था यंत्रणांकडून कुठल्याही प्रकारची अमर्याद कारवाई पत्रकारांमध्ये भीती निर्माण करत पूर्ण संस्थात्मक रचनेला कमकुवत करणारी ठरू शकते असे आयएनएसने म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियांचे पालन करत माध्यम कर्मचाऱ्यांना सामोरे जावे. पत्रकारांना स्वत:च्या व्यावसायिक कर्तव्यांचे पालन कुठल्याही दबावाशिवाय करता यावे याकरता अनुकूल वातावरण आवश्यक असल्याचे आयएनएसने नमूद केले आहे.
संबंधित पत्रकारांसोबत आयएनएस भक्कमपणे उभे असून प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठीची प्रतिबद्धता अधेरेखित करत असल्याचे एक वक्तव्य जारी करत आयएनएसने स्पष्ट केले आहे.