For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आम्ही नाही पाकिस्तानचा भाग

01:03 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आम्ही नाही पाकिस्तानचा भाग
Advertisement

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जनतेचा आक्रोश

Advertisement

वृत्तसंस्था/ मुझफ्फराबाद

‘आम्ही पाकिस्तानपासून स्वतंत्र आहोत’, अशी स्पष्ट आणि जाहीर घोषणा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानविरोधी आंदोलकांनी केली आहे. पाकिस्तानने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आमच्यासाठी अन्य मार्ग मोकळे आहेत, असा इशाराही आंदोलकांनी दिला. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाकिस्तान प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन होत आहे.

Advertisement

पाकिस्तान प्रशासनाच्या अन्यायपूर्ण आणि अत्याचारी प्रवृत्तीला कंटाळून या प्रदेशातल्या लोकांनी त्या देशाच्या प्रशासनाविरोधात प्रचंड आंदोलन छेडले आहे. आंदोलकांची गळचेपी करण्यासाठी पाकिस्तान प्रशासनाने या भागाच्या अन्नपाण्याचा पुरवठा तोडला आहे. त्यामुळे येथे अन्नधान्ये आणि पाणी यांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. तथापि, यामुळे दबून न जाता अधिकाधिक संख्येने लोक रस्त्यांवर उतरुन पाकिस्तानच्या क्रूर राजवटीविरोधात आंदोलन करीत आहेत. पाकिस्ताने या भागात अनेक स्थानी लष्कर नियुक्त केले असून बहुतेक भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी मोडून रावळकोट इदगाह मैदानावर आंदोलकांनी प्रचंड निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेत मंगळवारी या भागाच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

आम्हाला उपकार नकोत

पाकिस्तानचे उपकार आम्हाला नकोत. आम्ही त्यांच्या तुकड्यांवर जगत नाही. त्यांची आम्हाला नव्हे, तर आमची त्यांना आवश्यकता आहे. आमच्या जीवावर पाकिस्तानचे प्रशासन उड्या मारत आहे. त्याची जागा त्याला लवकरच कळून येईल. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे नेते सरदार अमन खान यांनी प्रशासनाला दिला आहे.

अन्य मार्ग चोखाळू

या भागाच्या अन्नपाण्याचा पुरवठा तोडून पाकिस्तानने येथील सर्वसामान्य जनतेवर सूड उगविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि, आमचा निर्धार कायम असून आम्ही कोणत्याही दबावाखाली येणार नाही. पाकिस्तान प्रशासनाने आमचा अन्न आणि औषधांचा पुरवठा पूर्ववत केला नाही, तर आम्ही अन्य मार्गांनी या जीवनावश्यक वस्तू मिळवून आमच्या जीवांचे रक्षण करु. आम्ही पाकिस्तानसमोर लाचार होणार नाही, अशीही स्पष्टोक्ती अमन खान यांनी केल्याचे वृत्त आहे.

मागण्या काय आहेत...

वाजवी दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंचा सातत्यपूर्ण आणि पुरेसा पुरवठा, तसेच प्रशासकीय सुधारणा या तीन मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. पाकिस्तान प्रशासनाकडून पाकिस्तानव्याप्त काश्मीरवर सतत अन्याय होत आहे. या भागात पिकणारे धान्यही या भागाला दिले जात नाही. हा भाग नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहे. पण येथील नैसर्गिक संपत्तीचा लाभ येथील जननेला मिळू दिला जात नाही. या संपत्तीच्या जीवावर अन्य भागातील लोक आपली उखळे पांढरी करुन घेत आहेत. परिणामी, सर्व क्षमता असूनही हा भाग दुर्लक्षित आणि गरीब राहिला आहे, असे आंदोलकांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

बॉक्स

दूरसंचारात अडथळे

या भागात होत असलेल्या आंदोलनाची आणि आंदोलकांवर होत असलेल्या अनन्वित प्रशासकीय अत्याचाराची माहिती जगाला कळू नये. म्हणून पाकिस्तान सरकारने इंटरनेट आणि मोबाईल सेवा रोखली आहे. दूरसंचार व्यवस्थेत जाणूनबुजून अडथळा निर्माण केला जात आहे. तथापि, आंदोलक त्यांच्या न्याय्य मागण्यांपासून ढळणार नाहीत. आमच्या मागण्या राजकीय स्वरुपाच्या नाहीत, हे त्या पाहिल्यानंतर कोणालाही समजते. तरीही पाकिस्तानचे प्रशासन निर्दयपणा दाखवत आहे. हे सहन केले जाणार नाही, असे आंदोलकांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानव्याप्त काश्मीर स्वतंत्र होणार ?

ड पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळून या भागातील जनतेचे प्रचंड आंदोलन

ड पाकिस्तानकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न, अन्नपाण्याचा पुरवठा केल बंद

ड अन्नपाणी न पुरविल्यास अन्य मार्गांचा उपयोग करण्याचा जनतेचा निर्धार

ड पाकिस्तान प्रशासनाच्या अत्याचारांचा भारतानेही केला तीव्र शब्दांमध्ये निषेध

Advertisement
Tags :

.