आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही!
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राहुल गांधी यांचे वक्तव्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी ईडीकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान ‘यंग इंडियन’चे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही. संविधानाच्या रक्षणासाठी लढा देणे हे आमचे काम आहे. देशाच्या सन्मानासाठी आमची लढाई सुरूच राहणार आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी गुरुवारी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘देशाचा कायदा सर्वांसाठी एक आहे. तो काँग्रेस अध्यक्ष किंवा काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसाठी बदलू शकत नाहीत. त्यांना भारताच्या कायद्याशी संघर्ष करायचा आहे. त्यांना कायद्याविरुद्ध लढू दिले जाणार नाही किंवा त्यांना पळून जाण्याची संधीही दिली जाणार नसल्याचे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी दिल्लीतील हेरॉल्ड बिल्डिंगमध्ये असलेले यंग इंडियन कंपनीचे कार्यालय सील केले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने ही कारवाई केली. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक दौरा सोडून दिल्लीत परतले होते. मंगळवारीच ईडीच्या पथकाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेरॉल्डच्या 16 ठिकाणी छापे टाकले. सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सोनिया-राहुल गांधी तुरुंगात जातील : सुब्रमण्यम स्वामी
नॅशनल हेरॉल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणात सोनिया-राहुल गांधी तुरुंगात जातील असेही त्यांचे म्हणणे आहे. हे प्रकरण पहिल्यांदा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये समोर आणले होते. ऑगस्ट 2014 मध्ये, ईडीने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे पुढे आली होती.