आम्ही.., कोणाला भीत नाही...!
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
तुरुंगातून स्वातंत्र्यसैनिक किंवा चळवळीतले कार्यकर्ते सुटल्यावर त्यांची खांद्यावरून मिरवणूक काढली तर ते खूप चांगले आहे. कारण असे कार्यकर्ते म्हणजे समाजाला प्रेरणा आहेत, पण गुंडगिरी, फाळकुटदादा, खंडणीसारख्या गुह्यातून सुटल्यानंतर जल्लोषी मिरवणूक काढणे म्हणजे आम्हाला कोणाची भीती उरलेलीच नाही, असा गुंडांनी समाजाला दिलेला संदेशच आहे. पोलिसांनी दखल घेऊन त्यांना काल पुन्हा बेड्या ठोकल्या, हे ठीक केले. पण आत्ता गुंडांच्या वर तोंड लपवण्याची वेळ येण्याऐवजी उजळ माथ्याने ते फिरत आहेत. मिरवणुका काढत आहेत, हे खूप घातक आहे. कोल्हापुरात हे उघड सुरू आहे. त्यांना नक्कीच कोणाचे तरी अभय आहे. आज कोल्हापुरात ठिकठिकाणी लागलेल्या बेकायदेशीर फलकावर याच गुंडांचे तेच ते चेहरे अगदी ठळक आहेत.
कोल्हापुरातील कळंबा कारागृहाबाहेर रोज किंवा ज्या दिवशी सुटका असते, त्या दिवशी गुन्हेगारांचे मित्र कुटुंबीयांची गर्दी असते. कुटुंबीयांची यावेळी उपस्थिती हे क्षणभर मान्य आहे. पण दुचाकी, चारचाकी वाहनांचा ताफा, फटाक्यांच्या माळा घेऊन कारागृहाबाहेर थांबणे व आपला माणूस कारागृहातून बाहेर आला, की तो जणू चळवळीच्या खटल्यातूनच सुटला, अशा पद्धतीने त्याची मिरवणूक काढण्याची पद्धत आता झाली आहे. गुंड जेवढा मोठा, तेवढा त्याच्या मिरवणुकीचा थाट मोठा झाला आहे. हा प्रकार कारागृहाच्या हद्दीबाहेर घडत असल्याने कारागृह प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही, अशी परिस्थिती आहे.
कारागृहाबाहेर आल्यावर मिरवणूक, हा झाला एक प्रकार. पण आपण कारागृहातून बाहेर पडलो, हे इतरांना कळावे म्हणून डिजिटल फलकाचा आधार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. स्वत:चा वाढदिवस किंवा जवळच्या इतर कोणाचाही वाढदिवस असू दे. त्या निमित्ताने आपला चेहरा झळकवण्याची संधी हे गुंड घेत आहेत. किंबहुना तो इतरांना इशारा देण्याचाही प्रकार आहे. अशा इर्षेबाज फलकाच्या युद्धात खूप मोठी गुंडगिरी दडली आहे. रंकाळा चौपाटीवर एका गटाचा फलक काढला की दुसऱ्या गटाचा फलक लागणारच, हे ठरलेले आहे. अनेक तरुण पोरांना अशा गुंडांसोबत ‘डिजिटल’वर आपला चेहरा झळकणे हे मोठेपणाचे प्रतीक वाटते. पण असे फलकावर फुकट झळकूनच अनेक तरुणांचे आयुष्य मारामारी, दंगल या गुह्यातील कोर्टाच्या तारखांत वाया गेले आहे. मोठे गुंड पैसे मिळवून बसले आहेत. पण बहुजन समाजातील ही सायडर पोरं पूर्ण बाद झाली आहेत.
काल ‘मोका’तून सुटल्यानंतर काढलेल्या मिरवणुकीतील 3 सख्खे भाऊ ‘मोका’तील आरोपी आहेत. मूळ सदर बाजारात ते राहतात आणि केव्हीज पार्कमध्ये त्यांची ये -जा आहे. सर्वसामान्य माणसाने हादरून जावे, अशी त्यांची दहशत आहे आणि फार मोठे गुपित तर अजिबातच नाही. शहरातील काही प्रतिष्ठीतांशी या ना त्या कारणाने ते संपर्कात आहेत. उघड नाही, पण नेत्यांनाही अशा लोकांची अनेक कारणाने गरजही आहे.
कोल्हापुरात असे गुंड वाढण्याची कारणे म्हणजे जुगार अड्डे, मटका, भाडेकरू काढण्याची सुपारी, पैसे वसुलीसाठी दहशत, छोट्या-मोठ्या कामातला वाटा म्हणजे फाळकुटगिरी, वादात असलेली जागा, घरे बळकावणे, गुटखा, मावा विक्रीसाठी तरुण पुरवणे. फक्त दहशत निर्माण करण्यासाठी पंधरा-वीस जण मिळून एखाद्याच्या घरासमोरून दुकानासमोरून रात्री मोठा सायकलचा ताफा फिरवणे, ड्राय डे दिवशी दारू विकण्याची यंत्रणा उभारणे आणि खासगी अर्थ कंपन्यांना वसुलीसाठी मदत करणे, असली कामे ही मंडळी करतात. थोडी रिस्क असते. पण कमाई भरपूर असते. नावही होते. कोणातरी नेत्याचे अप्रत्यक्ष अभय मिळते. वाढदिवस आला की अगदी ताराराणी चौकापासून निवृत्ती चौकापर्यंत झळकायला मिळते आणि मुक्त सैनिक परिसरात तर एका गुंडाबरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांची नव्हे तर शाळकरी मुलांचीही झुंबड उडते.
या साऱ्या परिस्थितीला पोलीस जबाबदार, हे म्हणणे सोपे आहे. पण अशा गुंडांकडून मंडळाला देणगी गणेशोत्सव, मोहरम, महाप्रसादाला देणगी स्वीकारणारा समाजही तितकाच जबाबदार आहे. पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत, हे खरेच आहे. पण कोणत्या पोलीस ठाण्याला कोण इन्स्पेक्टर त्या ताकदीचा हेही महत्त्वाचे आहे. कोल्हापूरला पोस्टिंग म्हणजे महा‘लक्ष्मी’ची कृपा म्हणून कोणी इन्स्पेक्टर आला असला तर गुंडगिरी मोडणे कठीणच आहे. पण कोल्हापूर पोलिसांनी ताकदीने या गुंडांची पाठ धरली तर काहीही अशक्य नाही, हे वास्तव आहे.
हा दहशत निर्माण करण्याचाच प्रकार
गंभीर गुह्यातील आरोपींनी वाहनांच्या ताफ्यासह आपली मिरवणूक काढणे, हा दहशत निर्माण करण्याचाच प्रकार आहे. न्यायालय जामीन ज्यावेळी देते, त्यावेळी काही अटी, शर्ती नक्कीच घालते. त्याचा भंग या आरोपींनी केला आहे काय, हे पाहून न्यायालयाला रिपोर्ट केला जाणार आहे.
संतोष डोके, पोलीस निरीक्षक शाहूपुरी