For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

`जनतेच्या आरोग्याविषयी आपल्याला चिंता`

02:59 PM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
 जनतेच्या आरोग्याविषयी आपल्याला चिंता
Advertisement

वाढदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे भावोद्गार : चाळीसही मतदारसंघांमध्ये ‘हेल्थ विथ आयुर्वेद’ उपक्रम

Advertisement

पणजी : गोव्यामध्ये एवढ्या रोजगार संधी आहेत, परंतु आमचे गोमंतकीय युवावर्ग संधीचा लाभ घेत नाहीत. राज्यातील जनतेच्या आरोग्याविषयी आपल्याला चिंता आहे, ‘हरित गोवा, स्वच्छ गोवा’ याबाबत देखील आपल्याला चिंता आहे. या सर्वांवर आपण उपाययोजना आखलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवेदन केले. आज आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. गेली सात वर्षे जनतेच्या आशीर्वादाने आपण मुख्यमंत्रीपदी राहून जनतेची सेवा करू शकलो. यानंतर देखील राज्यातील जनता आमच्यावर अशाच पद्धतीने प्रेम करील आणि पुन्हा एकदा आम्हाला संधी देईल, असेही भावपूर्ण निवेदन त्यांनी केले. आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेचे बिघडते आरोग्य ही आपल्यासाठी फार मोठी चिंता आहे. वाढते डायलेसिस पेशंट, वाढती मधुमेह रुग्णसंख्या, वाढते कर्करुग्ण, वाढते हृदयरोगी हा चिंतेचा विषय बनलेला आहे. आमची जीवनपद्धती बदलली आहे. त्यामुळेच या समस्येला तोंड देणे क्रमप्राप्त ठरले आहे, असेही ते म्हणाले.

‘स्वयंपूर्ण गेवा’ची प्रभावीपणे अंमलबजावणी

Advertisement

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री म्हणाले की, गोमंतकीय जनतेचा माझ्यावर असलेला आशीर्वाद माझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण सात वर्षे मुख्यमंत्रीपदी राहून जनतेची सेवा करू शकलो. जनतेने अशाच पद्धतीने यापुढे देखील आपल्याकडून सेवा करून घ्यावी. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला जनतेने संधी द्यावी, असे ते म्हणाले.   मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत आपण जनतेला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी झालो. त्याचबरोबर हॅप्पी इंडेक्स वाढविणे देखील शक्य झाले आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही आपण जी योजना सुरू केली त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून आता त्याचे फळ देखील आपल्याला चाखायला मिळतात. विरोधकांना देखील या ‘स्वयंपूर्ण गोवा’ची दखल घेणे भाग पडले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जनतेसाठी तीन मोठे कार्यक्रम आयोजित केले. त्यातील एक कार्यक्रम हा गुऊवारी वेर्णा येथे झाला. जिथे सुमारे 4,000 जणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आम्ही व्यक्त केला. त्यातील सुमारे 1300 जणांना येत्या दोन मेपर्यंत रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहोत. उर्वरितांना लागलीच रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाईल.

युवकांनी रोजगार संधीचा लाभ घ्या

मुख्यमंत्री म्हणाले की, युवकांना गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्यावा. सध्याच्या स्थितीमध्ये गोव्यात कोणीही बेकार राहूच शकत नाही. एवढी रोजगार संधी उपलब्ध आहे आणि ही संधी प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध आहे. या संधीचा गोव्यातील युवकांनी लाभ उठविला पाहिजे.

विद्यालयांमध्ये करियर मार्गदर्शन      

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज राज्यातील सर्व शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करीत आहोत. यासाठी 600 शिक्षकांना खास प्रशिक्षण दिले आहे. शिक्षकांनी मुलांना करिअरसंदर्भात माहिती देणे व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यांना माहिती मिळाली तर ते पुढे कोणते करिअर करणे गरजेचे आहे हे त्यांना समजेल म्हणून आपण स्वत: याकामी पुढाकार घेतला असून सर्व विद्यार्थ्यांना आज एकाच दिवशी करिअर मार्गदर्शन प्राप्त होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दिनचर्या व ऋतुचर्यासंदर्भात जनतेला माहिती देणार    

आपण जनतेची नेहमीच काळजी घेतो आणि आपल्याला आज जी काळजी वाटते. ती म्हणजे जनतेचे बिघडत असलेले आरोग्य. त्यासाठी आजपासून गोव्यातील 40 ही मतदारसंघांमध्ये ‘हेल्थ विथ आयुर्वेद“ ही योजना आपण सुरू करीत आहोत आणि ही योजना सांखळीतून आज सुरू होईल. गोव्यात मधुमेह, कर्करोग, हृदयरोग सारखे अनेक दुर्धर आजार वाढत चालले आहेत. त्यातच अनेकांची मूत्रपिंड खराब होतात त्यामुळे त्यांना डायलेसिस करावे लागते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व ही प्रकरणे आणखी वाढू नयेत यासाठी जनतेला दिनचर्या व ऋतुचर्यासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत. चाळीसही मतदारसंघात हे उपक्रम सुरू करीत आहोत. याशिवाय आजपासून जनतेसाठी ऑनलाइन आयुर्वेद मार्गदर्शन सुरू करणार आहोत. जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपली उपाययोजना आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. कर्करुग्ण, हृदयरुग्ण, डायलेसिस रुग्ण वाढू नयेत यासाठी ऊग्णांना मार्गदर्शन आम्ही करणार आहोत.

डबल इंजिनमुळे राज्याचा विकास साधला      

आपल्या कारकिर्दीमध्ये आपण जी काही कामे या जनतेसाठी केलेली आहेत त्यातून आपण खुश आहे. त्याचबरोबर आपल्याला सात वर्षांमध्ये ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या त्या केवळ डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे हे सर्व शक्य झाले, असे मुख्यमंत्री म्हणतात. जनतेचे आरोग्य युवावर्गासाठी रोजगार संधी आणि स्वच्छता या तिन्हीबाबत आजही आपण चिंतेत आहोत आणि या तिन्ही गोष्टींवर उपाययोजना आम्ही सुरू केलेली आहे. जनतेची साथ केवळ आमच्यासाठीच नव्हे तर जनतेसाठी जास्त उपयोगाची ठरणार आहे. या विद्यमान कारकिर्दीमध्ये पायाभूत सुविधांची जी कामे शिल्लक आहेत ती 100 टक्के पूर्ण केली जातील आणि त्याचबरोबर जी कामे चालू आहेत, ती आगामी कारकिर्दीमध्ये पूर्ण केली जातील, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत जनतेने दिलेला आशीर्वाद सहकार्य, प्रेम व निर्माण केलेली आपुलकी अशीच पाठीशी राहावी आणि त्यातूनच पुन्हा एकदा नव्याने संधी द्यावी, अशी इच्छाही प्रदर्शित केली.

Advertisement
Tags :

.