For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आम्ही सगळे धृतराष्ट्र....

06:22 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
आम्ही सगळे धृतराष्ट्र
Advertisement

पहलगाममध्ये धर्म विचारून 27 लोकांना गोळ्या घालण्यात आल्या तेव्हा वाईट वाटलंच, पण प्रकर्षाने मनात काय आलं असेल तर तो गीतेमधला पहिला श्लोक

Advertisement

‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयूत्सव: ।

मामका: पांडवाश्चैव किमकूर्वत संजय: ’...

Advertisement

पाकिस्तानी दहशतवादी तुमचा धर्म मान्य नाही हे सांगण्यासाठी निरपराध लोकांना मारायला लागले, त्या देशाचे लष्कर प्रमुख आमचाच धर्म श्रेष्ठ कसा हे पटवून द्यायला लागले, तेव्हा ते मनुष्य धर्म विसरले होते, राष्ट्रधर्म विसरले होते. शेवटी आपल्याला नेमकं काय हवंय हेच विसरल्यामुळे अशी माणसं, असे देश युद्धपिपासु बनतात. हेच गीतेने सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे रणभूमीतले युद्ध आमच्या जगण्यात सुद्धा तंतोतंत लागू पडतं. जगण्याच्या प्रत्येक पायरीवर युद्धजन्य स्थिती असतेच, ती स्वीकारणारा पुढे पुढे जात राहतो, तर नाकारणारा साऱ्या जगाला दोष देत बसतो. अशावेळी आपल्यासमोर असलेल्या शत्रूचा, युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास आणि अंदाज घेऊन मगच आपण अहंकार सोडून दंड थोपटावे. अन्यथा नाश अटळ असतो. युद्ध व्हायलाच हवं असं वाटणारे 99 टक्के लोक ते व्हावं म्हणून सतत प्रयत्नशील असतात. ज्याचं प्रतिनिधित्व धृतराष्ट्र करतो. म्हणूनच टीव्हीवर युद्ध बघणारे पुढे काय घडेल? म्हणून सतत sंप्atsaज्ज् टीव्ही बातम्या बघतात. म्हणजे आम्ही सगळे आंधळे धृतराष्ट्रच आहोत. कारण आपल्या सगळ्यांना डोळे असतात पण आत्मभानाची दृष्टी नसते. म्हणूनच आपण मागणी करतो, पी. ओ. के. घ्या, पाकिस्तान संपवा... कुठे हल्ले केले त्याचे पुरावे द्या... अशी वृत्ती असणारे धृतराष्ट्र गीतेच्या सुरुवातीलाच संजयला प्रश्न विचारतात, तिथे हजारो मैल रणांगणावर काय चाललंय? ते सांग असे म्हणतात. माणसाच्या या वृत्तीला जी वासनेतून निर्माण होते, त्याला आंधळेपणा म्हणतात, जी गोष्ट प्रत्येकजण जन्मत:च घेऊन येतो. हा फक्त इंद्रियांचा दोष नसतो तर ही मानसिकता असते. कारण माणसाला कायमच दुसऱ्याच्या तुलनेत जगायला आवडतं. असं आंधळेपण घेऊन जन्माला येणारी आमची पुढची पिढी दुर्योधनासारखीच असली तर त्यात दोष आपलाच असतो. आम्हीच नकारात्मक विचार घेऊन जगत असल्यामुळे मुलांनाही तसेच शिकवत राहतो. धर्माच्या नावाचा आश्रय घेऊन सुरू झालेलं युद्ध कुरूक्षेत्रात धर्मांधांना संपवून जातं. अशी चिडलेली, रागावलेली माणसं शंखध्वनी किंवा हल्ला प्रथम करतात किंवा सतत आरडाओरडा करत राहतात, खोटंनाटं रंगवून सांगतात, जे कौरवांनी केले तेच अनेक दहशतवादी हल्ल्याने सुद्धा पहलगामच्या घटनेपर्यंत भारतात केलंय. त्यानंतरची कारवाई परमात्म्याची आज्ञा स्वीकारून शंखनाद करत किंवा हल्ले परतवून आपण केली. गीतेत सांगितलेला शंखनाद ही प्रतिक्रिया नसून प्रतिसाद आहे, याची जाणीव तेव्हा आम्हाला झाली. मोदींनी कुठलीही भाषणबाजी केली नाही किंवा प्रतिक्रिया दिली नाही तर कृती करून दाखवली, तेव्हाच हा शंखनाद खरा ठरला. असं परमात्म्याला शरण जाणारं, आत्मज्ञानाची दृष्टी असणारं, तटस्थ विचारांचं नेतृत्व आम्हाला लाभल्यामुळेच विजयाच्या वाटा सुलभ झाल्या. सर्वच धर्म क्षेत्राला कुरुक्षेत्रात आणलं की मग मात्र विचार करायला लावणारं युद्ध होतं. धृतराष्ट्राला देखील डोळ्यापुढे क्षणभर का होईना पण प्रकाश निर्माण करणारे भव्यदिव्य काहीतरी घडेलच याची कल्पना होती, तरीही प्रश्न विचारणारा हा धृतराष्ट्र थांबतच नाही.

यासाठी ज्ञानदेवांनी मोराच्या पिसाऱ्याचा दृष्टांत दिलाय. पिसाऱ्यावर हजार डोळे देवानं रेखाटलेत पण एकालाही दृष्टी नाही, अशी हजारो माणसं जगात आहेत, ज्यांना जगण्याची दृष्टी नसली तरी दुसऱ्यांच्या जगात डोकावण्याची उत्सुकता आहे. तोवर आम्ही सगळे धृतराष्ट्रच आहोत. कारण युद्धाचा निकाल कधीच लागणार नाही तो फक्त इतिहास रचत राहतो. भूगोलाच्या सीमारेषा आणि अहंकाराचे नकाशे बदलत जातो. परमात्मा परिणाम ठरवतो, तुम्हाला पुढे काय आहे याची कधी जाणीवच होऊ देत नाही. म्हणून सगळं मीच करतोय ही भावना संपवून आपण फक्त कर्तव्य करत सद्भावनेनं चोख उत्तर देत गेलो की ते युद्ध यशस्वी झालेलं असतंच.

सौ.अद्वैता उमराणीकर

Advertisement
Tags :

.