For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निसर्गाच्या सान्निध्यात झोपड्यांमध्ये विसावले वायंगणी ग्रामस्थ

05:34 PM Feb 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
निसर्गाच्या सान्निध्यात झोपड्यांमध्ये विसावले वायंगणी ग्रामस्थ
Advertisement

माळरानावर घुमतोय हरिनामाचा गजर, व्हॉट्सऍपचाही पडलाय विसर

Advertisement

आचरा प्रतिनिधी
फोटो  परेश सावंत

एकमेकाला खेटून उभ्या राहिलेल्या झोपड्या, झोपड्यांमधून एकमेकांसोबत चाललेला मुक्तसंवाद, चुलीवरील जेवणाचा खमंग सुवास आणि बच्चे कंपनीच्या किलबिलाटाने वायंगणी गावपळणीचा दिवस उजाडला. चांदण्या रात्री गप्पांचे फड रंगले होते. गावपळणीच्या निमित्ताने दैनंदिन जीवनक्रमातून मुक्त होत वायंगणीवासीय नैसर्गिक पद्धतीने राहण्याचा अनोखा आनंद अनुभवत आहेत. मंगळवारी युरेका सायन्स क्लब कणकवली व विद्यानिकेतन कसाल हायस्कूलच्या विद्यार्थी वर्गाने वेशीवर स्थिरावलेल्या गावाकऱ्यांची भेट घेत वायंगणी गावपळणीचा अनुभव घेतला.सोमवारी दुपारी गाव सोडलेले वायंगणीवासिय सीमेबाहेर स्थिरावले. चिंदर सीमेलगत माळरानावर, कालावल हद्दीत नदीच्या कुशीत आपले संसार थाटले आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी ना शाळेचे टेन्शन, ना क्लासची भुणभुण असे गोष्टीतील जीवन अनुभवायला मिळत आहे. युवावर्गाने थेट नदीपात्र गाठत  मासेमारीला सुरुवात केली होती.  महिला वर्ग तर झोपड्या जवळ जवळच असल्याने बसल्या जागेवरून गप्पांचे फड रंगवताना दिसत होत्या सर्वांनी तिखट जेवणाने  पहिली रात्र जागवली. महिलावर्ग सामुदायिक स्वयंपाकाचा आनंद घेत आहेत. काही महिलांनी तर  बाजूच्या गावातून मासे आणून दगडाच्या चुली रचून माशाचे कालवण, मासे भाजताना दिसत होत्या. महिलांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये शेजारपणाचे नाते अधिक घट्ट झालेच शिवाय विचारांची देवाणघेवाण चालू होती. इलेक्ट्रॉनिक आणि मनोरंजनाची साधने घराघरात पोचली जरी असली तरी  सीमेबाहेर असणारी माणसे मात्र या विजेविनाच वावरताना दिसत होती.

Advertisement

माळरानावर घुमतोय हरिनामाचा गजर

व्हॉट्सऍपचा जमाना असताना मात्र वायंगणी गावपळणीत युवकवर्ग प्रौढांसमवेत मिळालेल्या निवांत वेळेत हरिनामाचा गजर करीत आहे. गाव वेशीबाहेर  स्थलांतरित होताना वायंगणी ग्रामस्थांनी भजनाची पेटी, तबला, टाळ आपल्यासोबत आणले होते. मोबाईलसारखी उपकरणे बाजूला ठेवून गावकरी हरिनामाच्या गजरात दंग झालेले दिसत होते. गावपळणीच्या निमिताने संपूर्ण गाव जवळपास निर्मनुष्य झाले आहे. ग्रामदैवत रवळनाथावर वायंगणी वासियांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे श्रद्धेने ही परंपरागत गावपळण उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत सुरू आहे.

Advertisement
Tags :

.