डोनाल्ड ट्रम्प-मोदी बैठकीचा मार्ग निघणार
पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार जयशंकर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान जयशंकर हे क्रिटिकल मिनरल्सच्या मंत्रिस्तरीय बैठकीत जयशंकर सामील होतील. महत्त्वपूर्ण खनिजांसंबंधी होणारी ही बैठक वॉशिंग्टनमध्ये पार पडणार आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांच्या अध्यक्षत्वाखाली होणारी ही पहिली उच्चस्तरीय बैठक असेल. ‘क्रिटिकल मिनरल्स मिनिस्ट्रीयल’ बैठकीचा उद्देश जगभरातील भागीदार देशांना एका व्यासपीठावर आणणे असून याच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण खजिनांची पुरवठासाखळी सुरक्षित करण्यासाठी सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण खनिजांमध्ये लिथियम, कोबाल्ट, निकल यासारखी आवश्यक सामग्री सामील असून ती इलेक्ट्रिक वाहने आणि रिन्यूवल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरपासून संरक्षण सामग्रीकरता महत्त्वाचा घटक आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारावरून तणाव निर्माण झालेला असताना ही उच्चस्तरीय बैठक पार पडत आहे. जयशंकर यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिका संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीची शक्यता पडताळून पाहिली जाऊ शकते. सूत्रांनुसार जयशंकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्यास दोन्ही देशांच्या संबंधांमधील अडथळा दूर झाल्याचा स्पष्ट संकेत ठरणार आहे.
युरोपीय महासंघासोबत मुक्त व्यापार करार
भारताने अलिकडेच युरोपीय महासंघात मुक्त व्यापार करार घोषित केला असताना जयशंकर यांचा हा अमेरिका दौरा होत आहे. हा करार भारतावरील अमेरिकेच्या दबावादरम्यान मैलाचा दगड मानला जात आहे. हा करार आधुनिक नियमांवर आधारित व्यापार भागीदारीच्या स्वरुपात तयार करण्यात आला असून तो सद्यकालीन जागतिक आव्हानांना सामना करण्यासोबत जगातील चौथ्या आणि दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांदरम्यान बाजारपेठेला आणखी दृढपणे जोडणारा आहे.