महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

द्वेषाच्या लाटा

06:29 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून टीकेचे मोहोळ उठविणाऱ्या मालदीवने आता सारवासारवीची भूमिका घेतली असली, तरी याप्रकरणामुळे भविष्यात भारत व मालदीव या दोन देशांतील संबंध आणखी बिघडण्याची चिन्हे आहेत. हिंदी महासागरात शेकडो बेटांच्या समूहातून आकारबद्ध झालेला सुंदर देश, अशी मालदीवची ओळख. या देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या या देशाकडे देश विदेशातील पर्यटकांचा नेहमीच ओघ असतो. भारतीय पर्यटकांनाही मालदीवमधील रमणीय बेटे खुणावत असतात. मुळात भारतीय समाज हा पर्यटनप्रेमी होय. देश कोणताही असो. तेथील निसर्गसंपदा, माणसे, त्यांची आहारपद्धती याबद्दल भारतीय मनाला कायमच कुतूहल राहिले आहे. दरवर्षी जवळपास 15 ते 20 टक्के भारतीय मालदीवला भेट देत असतात, ते याच आस्थेतून. मालदीवमधील स्थिती मात्र आज त्याउलट दिसून येते. या देशाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मोठ्या प्रमाणात बदलल्याचे पहायला मिळते. याला कदाचित तेथील सत्ताबदलही कारणीभूत असू शकेल. मालदीव डेमोव्रॅटिक पक्षाचे नेते व माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह हे भारत समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, मागच्या तीन-चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सोलिह यांना पिपल्स नॅशनल काँग्रेसच्या मोहम्मद मोइज्जू यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मोइज्जू हे चीनचे प्रबळ समर्थक आहेत. चीनशी संबंध वाढविण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अनेकदा भारतविरोधात वक्तव्येही केली होती. स्वाभाविकच ते सत्तेवर आल्यापासूनच भारत व मालदीवमध्ये अंतर वाढू लागले. हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हे एक निमित्त ठरावे. अलीकडेच भारतीय पंतप्रधानांनी लक्षद्वीपचा दौरा केला. या दौऱ्याद्वारे त्यांनी देशवासियांचे लक्ष लक्षद्वीपकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यांना साहसी पर्यटन आणि रोमांचकारी अनुभव हवा आहे. त्यांनी लक्षद्वीपला जरूर भेट द्यावी, असे आवाहन करीत काही छायाचित्रेही पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर टाकली. मालदीवला लक्षद्वीप हा कसा चांगला पर्याय आहे, हेही पंतप्रधानांनी या माध्यमातून ध्वनित केले. आपल्या देशातील पर्यटन उद्योग वाढावा. देशातील विविध पर्यटनस्थळांना देशविदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे जर कोणत्याही देशाच्या नेतृत्वाला वाटत असेल, तर त्यात काही गैर वाटून घेण्याचे कारण नाही. आपला देश, तेथील बेटांवरील वातावरण कसे निसर्गरम्य आहे, तेथील सागरी सफरीचा आनंदही कसा अवर्णनीय आहे, हे सांगण्याचा वा पर्यटकांच्या मनावर ठसविण्याचा अधिकार प्रत्येकास आहे. तो मान्य करण्याऐवजी मालदीवच्या मंत्रिमंडळातील मंत्री आक्षेपार्ह वक्तव्ये करीत असतील, तर त्यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदार या सदरातच मोडते. भौगोलिकदृष्ट्या भारतापासून अगदी जवळ असलेल्या मालदीवच्या पर्यटनव्यवसायाने विनयशीलता, उत्तम आदरातिथ्य, उच्च दर्जाच्या सुविधा या बळावर मागच्या काही वर्षांत या स्तरावर मोठी मजल मारली आहे. कोणत्याही राज्यातील वा देशातील पर्यटन उद्योग हा एका दिवसात उभा राहत नसतो. त्याकरिता वषानुवर्षाची मेहनत असते. त्याचबरोबर मार्केटिंग, जाहिरात तंत्राशिवाय त्यात विनम्रता व शालिनतेचा मोठा वाटा असतो. परंतु, एखादी कृती वा वक्तव्य एका दिवसात त्यावर बोळा फिरविते.  मरियम शिऊना, महझूम माजिद, माल्शा शरीफ यांच्या विधानांबाबत तसेच म्हणता येईल. आता मंत्रिपदावरून या मंडळींची उचलबांगडी झाली असली, तर त्यातून व्हायचे ते नुकसान झाले आहे. त्यांची विधाने वैयक्तिक स्वऊपाची असून, त्याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही, अशी सारवासारवीची भाषा तेथील सरकारने केली असेलही. परंतु, मोइज्जू यांचा भारतद्वेष पाहता या सगळ्यास त्यांची मूकसंमती नव्हती, असे कसे म्हणायचे? बाकी काही असो. मात्र, केवळ चीन वा तत्सम देशांवर आपला पर्यटनउद्योग चालणार नाही, याचे भान तरी या देशाच्या नेतृत्वाने बाळगायला हवे. देश व देशाच्या नेतृत्वाविषयीच्या शेरेबाजीनंतर भारतीय पर्यटकांनी उगारलेल्या बहिष्कारास्त्रातून तरी संबंधितांनी बोध घ्यायला हवा. विमानाची तिकीटे, हॉटेलमधील बुकिंग रद्द होणे, ही एक बाजू झाली. परंतु, भारतीय पर्यटकांचा मालदीवबद्दलचा दृष्टीकोन बदलला तर काय, याचाही कुठेतरी मोइज्जू व त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. त्या-त्या बेटाचे म्हणून सौंदर्य असते. बलस्थाने असतात. लक्षद्वीप सुंदर आहे, अशी मांडणी आपण केली म्हणजे मालदीव कुरूप होत नाही. त्यामुळे याचा प्रतिवाद करताना लक्षद्वीप पहा व आणखी वेगळी वैशिष्ट्यो असलेल्या मालदीवलाही भेट द्या, अशी जाहिरात त्या देशातील पर्यटन विभागास करता आली असती. त्याऐवजी लक्षद्वीप बेट मालदीवशी बरोबरी करू शकत नाही. अशी द्वेषपूर्ण मांडणी ते करीत बसले व तेथेच फसले. संपूर्ण जग हे विविध छोट्या मोठ्या देशांनी, बेटांनी विणलेले आहे. प्रत्येक देशाचे म्हणून एक सौंदर्य आहे. तेथील समुद्रकिनारे, नद्या, डोंगर, हिमशिखरे, जैवविविधता, निसर्ग आपल्याला वेगळा आनंद देत असतो. त्याची परस्परांशी तुलना होऊ शकत नाही. ते-ते पर्यटनस्थळ त्या-त्या ठिकाणी अजोडच असते. त्याची जागा दुसरे कुणी घेऊ शकत नाही. फक्त तुम्हाला त्याकडे निखळ दृष्टीने पाहता आले पाहिजे. या विचारास मूठमाती देत द्वेषाच्या लाटा उसळवल्या गेल्या, तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. झाले, तर नुकसान आणि फक्त नुकसानच होईल. हे मालदीवने ध्यानात घ्यावे. मागच्या काही दिवसांमध्ये दोन देशांमधील बिघडलेले संबंध बघता या देशाने आता सबुरीचे धोरण घ्यायला हवे. केवळ चीनवर अवलंबून राहण्याची घोडचूक केली, तर मालदीवच्या अर्थकारणाला ओहोटी लागल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article