For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीत सर्वत्र साचले पाणी

06:48 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पणजीत सर्वत्र साचले पाणी
Advertisement

केवळ अर्ध्या तासाच्याच पावसाचा मोठा परिणाम : दुकाने, वाहने, घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी : काल रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीत व सभोवतालच्या परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. तसेच काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीत व्यत्यय आला व वीजपुरवठाही खंडित झाला.

Advertisement

वाहनचालकांची धांदल उडाली आणि वाहने चालवणे कठीण होऊन बसले. दुचाकी चालकांची तर त्रेधातिरपीट झाली. मांडवी पुलावर जोरदार वादळीवारा पावसाने दुचाकी चालकांना वाहने चालवणे अशक्य झाले. त्यांना पुलावरच थांबणे भाग पडले. दुचाकी वाहने पुलावर जोरदार वाऱ्यामुळे हलू लागली. त्यांचा तोल जात असल्याने चालकांना पुलावरच एका बाजूने थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.

पणजीतील 18 जून हा रस्ता तर पूर्णपणे पाण्याखाली गेला. पणजी कदंब बस स्थानकाभोवती पाणी तुंबल्यामुळे वाहने चालवताना अडचणी निर्माण झाल्या. ईडीसी पाटो कॉम्पलेक्समध्ये बऱ्याच इमारतींमध्ये पाणी शिरले. रस्त्यावर गुडघ्याभराहून अधिक पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली. जवळपास अर्धा तास पावसाने धुवाधार बरसात केली. त्यामुळे मिरामार सकंल, पणजी मार्केट, पाटो इत्यादी विविध भागात पाणी तुंबल्यामुळे तळी निर्माण झाली. गजबज असणाऱ्या 18 जून मार्गावरील अनेक दुकानांतून पाणी घुसल्याच्या तक्रारी आहेत.

रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे जनतेची-वाहनांची वर्दळ कमी होती. मेरशी येथील आलुवा हॉटेलजवळ एक झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर पणजीतील डेल्टीन कॅसिनोबाहेर रस्त्यावर झाड पडले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तेथे जाऊन झाड हटवून रस्ता मोकळा केला. दोनापावला येथे गणेश मंदिराकडे झाड वीजतारांवर पडले. परिणामी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.