किमान चार तास देणार पाणी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन
पणजी : उद्योगांना, हॉटेल्सना, बंगल्यांना पाणी मिळते पण सर्वसामान्य गोमंतकीयांच्या घरांना पाणी मिळत नाही, अशी टीका विरोधी आमदारांनी करुन राज्य सरकारला धारेवर धरले. तसेच त्यांच्या मतदारसंघांतील पाणी टंचाईची तक्रार केली आणि त्यात सुधारणा करावी अशी मागणी केली. लोकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून राज्यात विविध ठिकाणी प्रकल्पांचे काम चालू असून प्रतिदिन किमान चार तास पाणी घरोघरी मिळावे म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2026 पर्यंत आणखी 250 एमएलडीचे पाणीप्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा दावा केला. पाणी टंचाईच्या विषयावर आमदार विजय सरदेसाई आणि इतर विरोधी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तिळारी धरणातून गोव्याकडे येणारा कालवा फुटला तेव्हा काही दिवस पाण्याची समस्या निर्माण झाली. काही भागात पाणी कमी मिळते किंवा मिळत नाही त्यावर उपाय म्हणून विविध योजना आखण्यात आल्या असून जलस्रोत खाते त्यासाठी चांगले काम करीत आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई काही भागात भासते परंतु ती तात्पुरती असते. त्यासाठी जलसंवर्धनाचे काम चालू असून पाण्याचे शुद्धीकरण करुनच ते देण्यात येते. गोव्यातील तळींचे संवर्धन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. तेच पाणी प्रक्रिया व शुद्ध करुन तेथील लोकांना पुरवण्याचा बेत आहे. राज्यातील बोअरवेल, टँकरची नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आले असून नोंदणी न करताच पाण्याचा वापर झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे. आमदार सरदेसाई यांच्यासह अल्टॉन डिकॉस्ता, कार्लुस फेरेरा आणि इतर विरोधकांनी पाणी समस्या मांडल्या व त्या सोडवण्याची मागणी केली.