कॅम्प परिसरात पाण्याचा अपव्यय
एलअँडटी उदासीन : मोठ्या प्रमाणात पाणी वाया
बेळगाव : बेळगाव-गणेशपूर मार्गावरील लक्ष्मीटेकडीनजीक कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे एलअँडटी कंपनीच्या बेजबाबदारपणाचा नमुना पहावयास मिळत आहे. सातत्याने शहरात पाणीगळती सुरू असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. अंकलगीनजीक हिडकलच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गुरुवारी आणि शुक्रवारी शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. त्यातच कॅम्प परिसरात विनाकारण पाणी वाहत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत.
शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच एलअँडटीकडून 24 तास पाणीपुरवठ्यासाठी शहरात नऊ ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आले आहेत. शिवाय अलीकडे 24 तास पाणीपुरवठ्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी केली जात आहे. शहरात विविध ठिकाणी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे कामही हाती घेण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊ लागला आहे. कायमस्वरुपी गळती थांबवावी, अशी मागणीही होत आहे.
कॅम्प परिसरात वाहणाऱ्या पाण्याविषयी एलअँडटी कंपनीकडे संपर्क साधला असता हे सर्व पाणी एलअँडटीचे नसून कॅम्प परिसरातील एमईएसचे असल्याचे सांगितले. जलकुंभ धुण्यासाठी काही वेळा पाणी उपसावे लागते. यासाठी हा पाण्याचा प्रवाह आहे. मात्र, सद्यस्थितीत एलअँडटीकडून तातडीने गळती निवारण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. शहरात कुठे ना कुठे दररोज पाणी वाया जाण्याचे प्रकार दिसत आहेत. मात्र, उन्हाळा आला की शहराला टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन आणि विनाकारण वाया जाणारे पाणी थांबविणे गरजेचे आहे. यासाठी एलअँडटी कंपनी लक्ष देणार का? हेच आता पहावे लागणार आहे.