For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : सातारा जिल्हा परिषद आवारातील कारंज्यातून पाण्याचा अपव्यय; योग्य नियोजनाची मागणी

03:16 PM Feb 26, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा जिल्हा परिषद आवारातील कारंज्यातून पाण्याचा अपव्यय  योग्य नियोजनाची मागणी
Advertisement

                           ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेतच पाण्याचा अपव्यय उघड

Advertisement

सातारा- ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना सातारा जिल्हा परिषदेच्या आवारातील कारंज्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब समोर आली आहे. कारंज्यातील पाणी सतत वाहून जात असल्याने पाणी संवर्धनाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील सजावटी कारंजे सुरू असताना त्यातील पाणी पुनर्वापरासाठी साठवले जात नसल्याचे दिसून येते. पाणी वाहत जात असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. सध्या वाढते तापमान, घटता पाणी साठा आणि ग्रामीण भागात टँकरची शक्यता लक्षात घेता अशा प्रकारचा अपव्यय अयोग्य असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हा चिटणीस विकास गोसावी यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारावर टीका केली आहे. “दुसऱ्यांना पाणी बचतीचे ब्रह्मज्ञान सांगायचे आणि स्वतः मात्र नियमांकडे दुर्लक्ष करायचे, ही दुहेरी भूमिका योग्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून कारंज्यातील पाणी पुनर्वापर यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. भूजल पातळी घटत असल्याने प्रशासनाकडून पाणी अडवा-पाणी जिरवा, जलसंधारण, गळती रोखणे अशा उपाययोजना राबविल्या जातात. मात्र त्याचवेळी शासकीय कार्यालयात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तथापि, लवकरच यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाईल, असे अनौपचारिकरीत्या सांगण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व अधोरेखित होत असताना प्रशासनानेच संवर्धनाचे आदर्श उदाहरण घालून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.