वायू ‘शुद्ध’ करणारे पाणी
सध्या वायूप्रदूषणाने देशातील अनेक भागांमध्ये मोठी समस्या निर्माण केली आहे. विशेषत: महानगरीय भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र आहे. महानगरांमध्ये वृक्षांची लागवड करण्यास संधी नसल्याने वायूप्रदूषणात भर पडले आणि अनेक नागरीकांना श्वसनाचे विकार होतात, काहीवेळा हे विकार गंभीर स्वरुपाचे असतात. यावर वैज्ञानिक संशोधकांनी एक रामबाण उपाय शोधून कढल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यांनी वायू शुद्ध करण्यासाठी ‘द्रवरुप वनस्पती’चा शोध लावला आहे. या उपायामुळे माणसाची अशुद्ध श्वसनवायूपासून सुटका केली जाते.
ही द्रवरुप वनस्पती म्हणजे एक विशिष्ट प्रकारची प्रकाश जैवभट्टी किंवा फोटो बायोरिअॅक्टर आहे. या रिअॅक्टरमुळे आपल्या घरातच वायू शुद्धीकरण केले जाते. या भट्टीत घरातील वायू शोषला जातो आणि वृक्ष किंवा वनस्पती ज्याप्रमाणे आपल्या प्रकाश संश्लेषणाच्या क्षमतेमुळे वातावरणातला अशुद्ध वायू शोषून घेऊन त्याचे विघटन करुन शुद्ध प्राणवायू वातावरणात सोडतात, तशी क्रिया होते. यामुळे आपल्याला झाडांशिवायच शुद्ध वायू श्वसनासाठी मिळू शकतो. या भट्टीत किंवा उपकरणात 600 लीटर पाणी भरले जाते. त्यानंतर त्यात एक विशिष्ट प्रकारची बुरशी किंवा अल्गी सोडली जाते. वातावरणातील अशुद्ध वायू शोषून, त्याचे विघटन करुन शुद्ध प्राणवायू वातावरणात सोडण्याची या बुरशीची क्षमता असते. या एका छोट्या उपकरणाची वायू शुद्ध करण्याची क्षमता, 10 वर्षांच्या दोन वृक्षांच्या क्षमतेइतकी असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. सूक्ष्म बुरशीची वायू विघटनाची क्षमता वृक्ष किंवा वनस्पती यांच्यापेक्षा 10 ते 50 पट अधिक असते, असेही निरीक्षणांमध्ये दिसून आले आहे. ही बुरशी निरुपद्रवी असल्याने तिचे इतर दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. या उपकरणाचा आणखी एक लाभ आहे. वायू प्रदूषण अधिक प्रमाणात असल्यास बाहेर लावलेले वृक्ष किंवा वनस्पतीही नष्ट होतात. तथापि, कितीही प्रदूषण असले, तरी या सूक्ष्म बुरशीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे ती सातत्याने आपले काम करीत राहते. आपल्याला शुद्ध वायूचा पुरवठा करीत राहते आणि त्या प्रक्रियेत स्वत:साठी अन्न्ही निर्माण करत राहते. अशा प्रकारे या साधनाचा लाभ घेता येतो, असे प्रतिपादन केले गेले आहे.