For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Water Quality Testing : रत्नागिरीत 1 हजार 534 गावांमध्ये होणार ‘पाणी गुणवत्ता तपासणी’

02:03 PM May 15, 2025 IST | Snehal Patil
water quality testing   रत्नागिरीत 1 हजार 534 गावांमध्ये होणार ‘पाणी गुणवत्ता तपासणी’
Advertisement

अभियानादरम्यान ‘फिल्ड टेस्टींग कीट’द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी होणार

Advertisement

रत्नागिरी : रत्नागिरी जिह्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ‘फिल्ड टेस्टींग कीट’ द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाची 2 ते 7 जून या कालावधीत अंमलबजावणी केली जाणार आहे. जिह्यातील 1 हजार 534 गावामध्ये या अभियानादरम्यान ‘फिल्ड टेस्टींग कीट’द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी दिली.

जिह्यात फिल्ड टेस्टींग कीटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानात जिह्यात रासायनिक व जैविक कीटद्वारे पिण्याच्या पाण्याची पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. जिह्यातील सर्व 1 हजार 534 गावांमध्ये नागरिकांना स्वच्छ, शुध्द गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलबध करून देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी केले आहे. तसेच या कीटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ रत्नागिरी येथे 13 मे रोजी करण्यात आला.

Advertisement

पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानांतर्गत रासायनिक व जैविक फिल्ड टेस्टींग कीट संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबवण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने 19 ते 23 मे या कालावधीत जनजागृती अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर 2 ते 7 जून या कालावधीत अभियानाची ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल.

अभियानांतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदवलेल्या 5 महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवताविषयक फिल्ड टेस्टींग कीट प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना फिल्ड टेस्टींग कीटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे.

आठवी वी ते दहावीमधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यू.क्यू.एम.आय.एस. पोर्टलवर नोंदी घेणे, नळपाणी पुरवठा योजना, घरगुती नळजोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक फिल्ड टेस्टींग कीटचे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहेत.

काय आहे क्षेत्रीय तपासणी (एफटीके) संच ?

फिल्ड टेस्टींग कीर म्हणजे क्षेत्रीय तपासणी संच हे एक पोर्टेबल उपकरण आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक व जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते. यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे, हा या संचाचा उद्देश आहे.

यामध्ये पी.एच.,क्लोरिन, नायट्रेट्स, फ्लोराईड, क्लोराईड, लोह, अल्कलिनिटी, गढूळपणा, हार्डनेस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या रासायनिक तसेच जैविक घटकांची तपासणी केली जाते. याचा लगेच निकाल (प्राथमिक स्तरावर) मिळतो.

Advertisement
Tags :

.