शहापूर कोरे गल्लीत पाण्याच्या टाकीला गळती
बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना राबविण्याची गरज असताना शहापूर येथील कोरे गल्लीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यासाठी वेळीच संबंधित विभागाने गळती काढण्याची मागणी होत आहे.
सदर पाण्याच्या टाकीतून सतत पाणी गळत असल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूला उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला होत असलेली पाण्याची नासाडी नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत चालली आहे. यासाठी आतापासूनच पाण्याची नासाडी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.
उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व वाढून पाण्याची मागणी अधिक असते. आता जरी जलाशयात मुबलक पाणी असले तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी उच्चप्रमाणात असते. यासाठी पाणी बचतीसाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. महापालिकेनेही पाण्याच्या बचतीसाठी विशेष उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जागृती करण्याची आवश्यक आहे.दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पाणीगळती थांबवावी. टाकीची दुऊस्ती करून परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी रहिवाशांतून होत आहे.