निम्म्या शहरात आज, उद्या पाणापुरवठा राहणार बंद
कोल्हापूर
शहरातील ए, बी आणि ई वॉर्डमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे निम्म्याशहरावर पाणीबाणीचे संकट राहणार असून या भागात महापालिकेच्या वतीने 20 टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बुधवारीही शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. .
पुईखडी उपसा केंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या 33 किलोव्हॅटच्या व 110 किलोव्हॅटच्या मुख्य विज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम सोमवार (6) व मंगळवार (7 जानेवारी) रोजी महावितरणच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. यामुळे दोन दिवस पुईखडी उपसा केंद्रातून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेच्या मासिक देखभाल दुरुस्तीचे काम, अमृत - 1 योजने अंतर्गत बावडा फिल्टर नविन पंपहाऊस येथील ग्रॅव्हिटी मेनच्या क्रॉस कनेक्शन व सुभाष नगर पंपींग येथील नविन रायझींग मेनलाईन जोडण्याचे कामही आज आणि उद्या महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शहरातील ए, बी, ई वॉर्ड सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागामध्ये दैनंदिन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवारीही या भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सी, डी वॉर्डमध्ये सुरळीत पाणीपुरवठा
शहरातील सी आणि डी वॉर्डमध्ये सोमवार आणि मंगळवारी सुरळीत पाणीपुरवठा सुरु राहणार आहे. सी आणि डी वॉर्डला बालिंगा आणि नागदेवाडी उपसा केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे या भागातील पाणीपुरवठ्यावर कोणताच परिणाम होणार नाही.
20 टँकरची व्यवस्था
महापालिका आणि महावितरणच्या वतीने सोमवार आणि मंगळवारी मासिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे सोमवार आणि मंगळवारी शहरातील ए, बी आणि ई वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने 20 टँकरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जलअभियंता हर्षदीप घाटगे यांनी दिली.