For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जलवाहिनी फुटल्याने पेढेसह ११ गावांचा पाणीपुरवठा ठप्प

10:32 AM Sep 10, 2025 IST | Radhika Patil
जलवाहिनी फुटल्याने पेढेसह ११ गावांचा पाणीपुरवठा ठप्प
Advertisement

चिपळूण :

Advertisement

चिपळूण-वालोपे येथून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीसह परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पेढे-फरशी तिठा येथे फुटून हाहाकार माजला. फुटलेल्या पाईपलाईनमधील पाण्याच्या उच्च दाबामुळे तब्बल 20 ते 25 फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामध्ये पाईपलाईनला लागूनच असलेल्या दोन दुकानांचे सुमारे 7 लाखाचे नुकसान झाले. एमआयडीसीने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून या घटनेमुळे दोन दिवस औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांसह परिसरातील असंख्य गावांना वाशिष्ठी नदीवरील वालोपे येथील एमआयडीसी पंपहाऊसमधून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वालोपे ते लोटे एमआयडीसी जलशुद्धीकरणापर्यंत सुमारे 6 कि.मी. लांबीची आणि 700 एम. एम. व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मध्यंतरी संपूर्ण पाईपलाईन बदलण्यात आली. मात्र सध्या ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली, तेथे लागूनच असलेल्या दुकानामुळे तेथील दीड मीटर पाईपलाईनचा भाग बदलणे शिल्लक राहिले होते. मात्र सोमवारी तोच भाग फुटला आणि नुकसान झाले. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

Advertisement

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्लक राहिलेल्या फरशी तिठा येथील पाईपलाईनला 15 दिवसांपासून गळती लागली होती. यासंदर्भात एमआयडीसीकडे कळवण्यात आले होते. मात्र दुर्लक्ष केले गेले असल्याचा आरोप करण्यात आला. तर एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात संपर्क साधला असता ज्या ठिकाणी गळती लागली, तेथील भाग बदलायचा झाल्यास तेथील दुकानाचे एक टोक अडचण निर्माण करीत होते. शिवाय गणेशोत्सव असल्याने दुरुस्ती हाती घेतली असती तर 2-3 दिवस पाणी बंद ठेवावे लागणार होते. त्यामुळे याबाबत पुढील प्रक्रिया सुरू असतानाच पाईपलाईन फुटली असल्याचा खुलासा करण्यात आला.

सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्फोटासारखा मोठा आवाज करत पाईपलाईन फुटली. पाण्याच्या उच्च दाबामुळे हवेत सुमारे 20 ते 25 फुट उंच पाण्याचा फवारा उडाला. परिणामी तेथे लागूनच असलेल्या नरेंद्र माळी यांच्या दुकानाचे साडेसहा लाखाचे तर राकेश गडदे यांच्या दुकानातील फ्रिज व प्रिंटर पाण्याने भिजून नुकसान झाले. माळी यांच्या दुकानात पाणी जाऊन आतील साहित्याची मोठी नासधूस झाली. मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के, तलाठी विजय मिटकर यांनी सुमारे 7 लाख नुकसानीचा पंचनामा केला. पाण्याचा दाब एवढा होता की, माळी यांच्या दुकानाचा कोपरा एका बाजूने थेट पत्रा, शटर वाकवून उडाला होता. स्थानिकांनी तत्काळ प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना कळवल्यानंतर त्यांनी एमआयडीसीला पाणीपुरवठा बंद करण्यास सांगितले.

  • एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

सोमवारी रात्री फुटलेल्या पाईपलाईच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी हाती घेण्यात आले. त्यासाठी एमआयडीसीने 24 तासांचा ब्रेकडाऊन घेतला आहे. तरीही पुढील 2 दिवस लोटे औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता एमआयडीसीच्या सूत्रांनी वर्तवली आहे. तशा सूचना कारखानदारांना दिल्या गेल्याचे सांगण्यात आले.

  • दीड वर्षांपूर्वी अशीच घटना, असेच नुकसान

मुळातच लोटे येथे गेलेल्या या पाईपलाईनच्या आजूबाजूला दुकाने उभारण्यात आली आहेत. गतवर्षी अशाच प्रकारे पाईपलाईन फुटून 9 दुकानांचे तब्बल 13 लाखांचे नुकसान झाले होते. सोमवारी अशाचप्रकारे पाईपलाईन फुटून दुकानांचे नुकसान झाले. मात्र यावेळी नुकसानीची झळ काहीशी कमी आहे.

Advertisement
Tags :

.