For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिदरभावी शेतवडीतील पाणीपुरवठ्यात विजेअभावी समस्या

09:27 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिदरभावी शेतवडीतील पाणीपुरवठ्यात विजेअभावी समस्या
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

बिदरभावी परिसरातील शेतवडीत गेल्या पंधरा दिवसापासून सुरळीत विजपुरवठा होत नसल्याने शेती पिकांसाठी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाल्याने पिके सुकुन जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वीजपुरवठ्याअभावी बोअरवेल बंद राहिल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. गर्लगुंजी फिडरद्वारे तोपिनकट्टी व बिदरभावी येथील परिसरातील शेतवडीला वीजपुरवठा करण्यात येतो. 1980 साली या शेतवडीत वीजवाहिन्या घातल्या आहेत. तब्बल 43 वर्षे झाल्याने वीजवाहिन्या वारंवार तुटून पडतात. रात्रीच्या वेळी वीजवाहिन्या दिसत नसल्याने धोका संभवतो. यापुढे कोणताही अनर्थ घडू नये म्हणून येथे नव्याने वीजवाहिन्या घालण्याची गरज व्यक्त होत आहे. शासनाकडून शेतीसाठी किमान सहा तास वीजपुरवठा करावा, असा आदेश आहे. पण अनेक कारणे पुढे करून केवळ दोन तास वीजपुरवठा करण्यात येत नाही. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. याचा परिणाम बोअरवेलची मोटर खराब होण्यात होतो. परिणामी पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके सुकून धोक्यात आली आहेत. यापूर्वी मोबाईलद्वारे हेस्कॉम अधिकाऱ्यांना यासंबंधी माहिती देण्यात आली. परंतु आश्वासनापलीकडे काहीच केलेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी खानापूर हेस्कॉमचे कार्यालय गाठून आपला तीव्र संताप व्यक्त केला. वेळीच वीजपुरवठा न झाल्यास मोर्चा काढण्याचा व प्रसंगी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी या भागातील शेतकरी भरमाणी पाटील, मल्लाप्पा पाटील, तानाजी पाटील, सोमनाथ तिरवीर, नारायण पाटील, नागेश कुरबर, शंकर पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.