For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प

10:43 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प
Advertisement

नियोजनाचा अभाव-नागरिकांचे हाल, सध्या शहराला टँकरने पाणीपुरवठा : शहरातील कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा करावा : ग्रामस्थांची मागणी

Advertisement

खानापूर : शहरातील नगरपंचायतीचा पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसापासून बंद पडला आहे. याकडे नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गेल्यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्याने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. मात्र प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याने खानापूर शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्याने नदीचे पाणी डिसेंबरमध्ये प्रवाहित होणे बंद झाले आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या बंधाऱ्यात पाणी अडवून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र नदीतील पाणीपातळी घटल्याने जॅकवेलजवळील पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे जॅकलेवलमधून पाणी खेचणे बंद झाल्याने गेल्या पाच दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. याबाबत नगरपंचायतीने शहरातील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. जॅकवेलमधून पाणी खेचण्यासाठी 50 अश्वशक्तीच्या दोन मोटारी कार्यरत आहेत. मात्र यातील एक मोटार नादुरुस्त झाल्याने गेल्या पाच वर्षापासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नगरपंचायतीने मोटारी दुरुस्त करून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे होते. गेल्या पाच वर्षापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असूनदेखील संपूर्ण वर्षभराची पाणीपट्टी घेण्यात येत आहे. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने जानेवारीपासून जूनपर्यंत पाणीटंचाई निर्माण होत आहे हे माहित असूनदेखील नगरपंचायतीने कोणतेही नियोजन केले नाही. पाणीपातळी घटल्याने आता नदीपात्रातील इतर ठिकाणचे पाणी उपसा करून सोडण्यात येत आहे. शहरातील सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याने नदीपात्रातील पाणीपुरवठा बंद करून शहरातील कूपनलिका तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

योग्य नियोजन करू : तहसीलदार

Advertisement

याबाबत नगरपंचायतीचे प्रशासक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना विचारले असता त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, येत्या काही दिवसात शहरातील पाण्याच्या पुरवठ्यासंदर्भात योग्य नियोजन केले जाईल आणि शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. यासाठी पाणीपुरवठादारांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.