कंग्राळी लक्ष्मी गल्लीत 15-20 दिवसाआड पाणीपुरवठा
नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : ग्रामपंचायत सदस्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याने महिला ग्रामपंचायतीवर मोर्चा नेण्याच्या तयारीत
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
येथील लक्ष्मी गल्लीतील नागरिकांचे पंधरा ते वीस दिवसाआड पाणी येत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याविना हाल होत आहेत. ऐन नवरात्रोत्सवात ग्रामपंचायतीचे पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या गल्लीला कोणी वाली आहे की नाही, अशा संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. गटारीही तुंबलेल्या आहेत. एकूण लक्ष्मी गल्लीमध्ये अनेक नागरी समस्या आ वासून आहेत. सर्व समस्या संबंधित शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी त्वरित सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा, ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा गल्लीतील महिलांनी दिला आहे. गल्लीतील पाणी समस्येकडे कायम दुर्लक्ष करण्यात येते. निवडणुकीवेळी मतांचा जोगवा मागणाऱ्या सदस्यांचे तरी या गल्लीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
विहिरींना जड पाणी असल्याने समस्येत भर
लक्ष्मी गल्ली परिसरामधील विहिरींना जड पाणीसाठा आहे. फक्त जनावरांना व इतर वापरासाठी या पाण्याचा उपयोग होतो. या गल्लीतील नागरिकांना नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. परंतु नळाचे पाणीसुद्धा 15-20 दिवसाआड सोडत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रा. पं. ने निदान आठवड्यातून तरी पाणी सोडणे गरजेचे आहे.
राजकारणामुळे विकासाला खिळ
कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीला गावच्या सर्वांगीण विकासापेक्षा अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाबदलीमध्येच अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. कारण 2020 मध्ये ग्रा. पं. निवडणुका झाल्या तेव्हापासून तीन वेळा ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्षांची बदलाबदली केली असून, आता चौथ्यांदा अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलीच्या खटाटोपात सदस्य असल्याचे दिसून येत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या या बदलाबदलीमुळेच या चार वर्षात संपूर्ण गावचा विकास खुंटला असल्याची खंत नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहे.
ग्रा. पं. ने नियोजन आखून काम करणे गरजेचे आहे ?
कन्नड प्राथमिक शाळा ते गावाजवळील तलावापर्यंत काँक्रिटच्या गटारी बांधण्याचे काम सुरू असताना गटारींचे काम संपण्याआधीच जलनिर्मल योजनेची पाईप व नळ कनेक्शन लक्ष्मी गल्लीतील नागरिकांना देण्यात आले. परंतु लगेच पुन्हा गटार खोदाई करण्यात आली. यामुळे जलनिर्मल योजनेतून जोडलेले नळकनेक्शन तोडण्यात आले. परंतु ग्रा. पं. ने जर प्रथम गटार निर्मितीनंतर जलनिर्मल योजनेचे जल कनेक्शन असे नियोजन करून दोन्ही कामे केली असती तर नागरिकांना नाहक त्रास झाला नसता. परंतु ग्रा. पं. सदस्यांना नियोजनबद्ध काम करण्यास वेळच नसल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. तेव्हा संबंधित ता. पं., जि. प. व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रा. पं. च्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.