Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे गेटजवळ पाणी संघर्ष समितीचे आंदोलन
तिलाटी रेल्वे गेट परिसरात पाणी संघर्ष समितीचे आंदोलन
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे गेट क्रमांक ६१ परिसरात पाणी संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे प्रशासन व राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३५ वाजता पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष गौरीशंकर गणपती बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली १२ ते १५ कार्यकर्त्यांनी प्रथम रास्ता रोको आंदोलन केले.
यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत आंदोलकांनी याच ठिकाणी आमरणउपोषणास सुरुवात केली. हे आंदोलन तिलाटी रेल्वे गेटपासून सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर, शहर हद्दीत सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आरपीएफ सोलापूर यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन व राज्य शासनाने मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.