For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राकसकोपमध्ये गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अधिक

11:47 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
राकसकोपमध्ये गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठा अधिक
Advertisement

उष्म्यामुळे जलाशयातून दररोज 0.15 फूट पाण्याचे बाष्पीभवन : 15 मार्चपासून एलअँडटी करणार पाण्याचे नियोजन

Advertisement

बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असला तरी उष्म्यात प्रचंड वाढ झाल्याने दररोज 0.1 ते 0.15 फुटापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी एलअँडटी कंपनीकडून 15 मार्चपासून पाण्याचे उन्हाळी नियोजन (समर अॅक्शन) केले जाणार आहे. त्यानुसार हिडकल जलाशयातून पाण्याचा अधिक उपसा तर राकसकोप जलाशयातून पाण्याचा कमी उपसा केला जाणार आहे.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यासह जिल्ह्यातील विविध जलाशयांमध्ये पाण्याचा समाधानकारक साठा आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाण्याचा साठा आहे. मात्र उष्णतेत मोठी वाढ झाली असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी 2465.20 फूट इतका पाणीसाठा होता. यंदा आजपर्यंत 2465.65 फूट इतका पाणीसाठा आहे. हिडकल जलाशयाच्या तुलनेत राकसकोप जलाशयाचे पाणलोट क्षेत्र कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात जलाशय लवकर भरतो आणि उन्हाळ्यात पाणीसाठा जलद गतीने कमी होतो. त्यातच उन्हामुळे दररोज 0.1 फूट ते 0.15 फूट पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे.

Advertisement

राकसकोप जलाशयातून दररोज 52 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी बेळगाव शहरासाठी लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तर हिडकल जलाशयातून 50 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी बसवणकोळ जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. आता यामध्ये 15 मार्चपासून बदल केला जाणार असून हिडकल जलाशयातून पाण्याचा अधिक उपसा केला जाणार आहे. तर राकसकोप जलाशयातून पाण्याचा कमी उपसा केला जाणार आहे. एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिडकल जलाशयातून 15 मार्चपासून 57 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा उपसा केले जाणार आहे. उन्हाळ्यात शहराला पाण्याची समस्या भासू नये यासाठी एलअँडटीकडून नियोजन केले जात आहे. सध्या आठ दिवसातून एकदा पाणी सोडले जात असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली

खंडित वीजपुरवठ्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम

हेस्कॉमकडून वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये यासाठी एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे. हिडकल जलाशयात सध्या 24.03 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून राकसकोप जलाशयाची 0.7 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे.

Advertisement
Tags :

.