For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : उंब्रजमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई, जलजीवन योजना रेंगाळली !

01:44 PM Oct 24, 2025 IST | NEETA POTDAR
satara   उंब्रजमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई  जलजीवन योजना रेंगाळली
Advertisement

              ऐन सणासुदीच्या काळात उंब्रजमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न

Advertisement

प्रवीण कांबळे/ उंब्रज : ऐन सणासुदीच्या काळात उंब्रज ता. कराड येथे पाण्याचा प्रश्न चिघळला आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या जलजीवन योजनेचे काम रेंगाळल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढत्या लोकसंख्येचा भार आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे उंब्रज ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पदाधिकारी सध्या अक्षरशः धावपळ करत आहेत.

दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात नागरिकांना पुरेसे पाणी न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब झाली असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहायची? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीकाठी असणाऱ्या इंटेकवेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नदीची पातळी खालावल्याने पाणी उचलण्यात अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे संपूर्ण गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून सुरू झालेली जलजीवन योजना सुरुवातीला गतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. परंतु ठेकेदार व संबंधित प्राधिकरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेवटच्या टप्प्यात आलेले हे काम मागील एक वर्षांपासून रखडलेले आहे.

Advertisement

व्यवस्थापनातील अकार्यक्षमता यामुळे अद्याप ही योजना सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी, विस्तारित उंब्रजसारख्या वाढत्या गावाची तहान भागवणे कठीण झाले आहे. त्यातच महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. पिण्याच्या पाण्यासह घरगुती आणि इतर कामांसाठी लागणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सतत पळापळ करत असल्याचे चित्र असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.

या संदर्भात उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,सध्या जुन्या इंटेकवेलला पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने उपसा करणे कठीण झाले आहे. जेसीबी व पोकलेनच्या साह्याने इंटेकवेलपर्यंत पाणी आणण्याचे काम सुरू आहे. मात्र जलजीवन योजनेचे काम रेंगाळल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्राधिकरण विभागाने तातडीने लक्ष घालावे.

वीज वितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका...

गेल्या काही महिन्यांपासून उंब्रज महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना बसला आहे. उंब्रजच्या पाणी योजनेलाही याचा मोठा फटका बसला असून सतत वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होत आहे. नळाला पाणी सुरू होते आणि लाईट जाते असे प्रकार सुरू आहेत. तसेच वारंवार घरगुती व शेती पंपाची वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने मोठी पंचायत निर्माण झाले आहे याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.