For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी परिसरात पाणीटंचाईचे सावट गडद

10:27 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी परिसरात पाणीटंचाईचे सावट गडद
Advertisement

मलप्रभा नदीपात्र कोरडे : अनेक गावांना आठवड्यातून केवळ एक-दोन दिवसच पाणीपुरवठा

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

जांबोटी विभागात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद बनले असून या भागातून वाहणारी मलप्रभा नदी कोरडी पडल्यामुळे अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बेळगाव जिल्ह्यात जांबोटी, कणकुंबी विभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, यंदा नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे या भागाची जीवनदायिनी असलेली मलप्रभा नदी फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरडी पडली आहे. तसेच या भागातील बारमही वाहणारे नालेदेखील यावर्षी पाण्याअभावी कोरडे पडल्यामुळे तसेच विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठल्यामुळे अनेक गावांना गंभीर पाणीटंचाईने ग्रासले आहे. वास्तविक, या भागातून वाहणारी मलप्रभा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. परंतु या भागात शासनाने या नदीवर पाणी अडविण्यासाठी बंधारे अथवा पाणी आडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत कोणताही उपक्रम राबविला नसल्यामुळे, या भागातील नागरिकांना उन्हाळ्dयात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या भागातील आमटे, तोराळी, कुसमळी, वडगाव, ओलमणी आदी गावांना मलप्रभा नदीतून नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.  मात्र मागील वर्षी या भागात झालेल्या अत्यल्प पावसामुळे मलप्रभा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जांबोटीसारख्या गावाला आठवड्यातून केवळ एक वेळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच ओलमणी गावालादेखील आठवड्यातून केवळ दोनवेळा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. हब्बनहट्टी व वडगाव या दोन गावच्या नळपाणी योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. तसेच आमटे येथे ग्राम पंचायतने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. या भागातील पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. काही गावातील नागरिक पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Advertisement

जलजीवन मिशन योजना कुचकामी

जांबोटी भागात प्रत्येक गावात केंद्र सरकारने लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबवून घरोघरी नळपाणी योजना कार्यान्वित केली आहे. मात्र या योजनेसाठी आवश्यक असणारे पाण्याचे स्त्राsतच उपलब्ध नसल्यामुळे ही योजना भागातील नागरिकांसाठी कुचकामी ठरली आहे. वास्तविक, जांबोटी भागात अनेक गावांना मलप्रभा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. ज्या ठिकाणी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी मलप्रभा नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी बंधारे निर्मिती करून पावसाळ्dयात पाण्याची साठवणूक करण्याची आवश्यकता आहे. तरी शासनाने लक्ष घालून जांबोटी भागात उद्भवणारी पाणीटंचाई निकालात काढण्यासाठी मलप्रभा नदीवर आवश्यक ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Advertisement
Tags :

.