निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट...
नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव
मनपातर्फे टँकरने पाणीपुरवठा
बुजवडे येथील थेट पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्याचा परिणाम
कोल्हापूर :
राधानगरी तालुक्यातील बुजवडे गावच्या हद्दीत थेट पाईपलाईन योजनेतील जॉईंट व्हॉल्व्ह शुक्रवारी फुटल्याने दोन दिवस पाणी उपसा बंद राहीला. शनिवारी महापालिकेच्यावतीने व्हॉल्व्हच्या दुरूस्तीचे काम पुर्ण झाले असले तरी शनिवारी सायंकाळी व रविवारी दिवसभर निम्म्या शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी आलेच नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला.
शहरातील मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, गंजीमाळ, संभाजीनगर, राजेंद्रनगर, आयटीआय, आपटेनगर, फुलेवाडीसह उपनगरातील बहुतांश भागात शनिवारी व रविवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. शनिवारी रात्री व रवावारी सकाळीही पाणी आलेच नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. महालिकेच्यावतीने पाणी टंचाई असणाऱ्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तर काही नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला.
सोमवारी महावितरणच्यावतीने काळम्मावाडी योजनेतील बालिंगा उपसाकेंद्रातील 33 केव्हीच्या मुख्य वाहीनीच्या देखभाल व दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र बुजवडे गावातील थेट पाईप लाईनचा जॉईंट व्हॉल्व्ह फुटल्याने शनिवारी व रविवारी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे सोमवारी महावितरणकडून काळम्मावाडी योजनेचे हाती घेण्यात आलेले काम थांबवून केवळ बालिंगा उपसाकेंद्राच्या वाहीनीचे काम करण्यात येणार असल्याने बालिंगा परिसर वगळून शहरात सोमवारी नियमित पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
पाणी पुरवठा विस्कळीत.. नागरिक हैराण..
थेट पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्याने शहरातील निम्म्या भागात शनिवारी व रविवारी दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला. आजही महावितरणकडून काम हाती घेण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार वारंवार होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या अडचणींमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
खासगी टँकरना पेव.. दर वाढले
काही ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना खासगी पाणी पुरवठा संस्थांचा आधार घ्यावा लागला. पाणी टंचाई जाणवताच खासगी टँकरना पेव फुटले असुन दरात वाढ केली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
आजपासून पाणी पुरवठा सुरळीत
बुजवडे येथील व्हॉल्व्हच्या गळतीमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे सोमवारी महावितरणकडून काळम्मावाडी बालिंगा योजनेच्या दुरूस्तीचे काम रद्द केले आहे. केवळ बालिंगा येथील जुन्या पाईपलाईनची दुरूस्ती केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
-हर्षजित घाटगे, मनपा, शहर जलअभियंता