For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भालकेत भीषण पाणीटंचाई : पाण्यासाठी वणवण

10:39 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
भालकेत भीषण पाणीटंचाई   पाण्यासाठी वणवण
Advertisement

कूपनलिकेची मोटार नादुरुस्त : दुरुस्तीकडे गुंजी ग्रा. पं.चे दुर्लक्ष : नागरिकांतून संताप

Advertisement

वार्ताहर /गुंजी

गुंजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भालके बी. के. येथे पाण्याची भीषण टंचाई भासत असून येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आठ दिवसांपूर्वी गावात असलेल्या बोअरवेलची मोटार नादुरुस्त झाल्याने गावात पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्याचबरोबर जलजीवन योजनेमधून नवीन नळकनेक्शनसाठी जुनी पाईपलाईन काढून टाकल्याने सध्या या गावांमध्ये पाण्यासाठी लोकांना दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी भालके गावामध्ये जुन्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या ठिकाणी नवीन विहीर खोदाई करण्यात आली. मात्र वेळोवेळी गुंजी ग्राम पंचायतीला अर्जविनंती करूनसुद्धा पंचायतीने अद्याप या विहिरीला विद्युतपंप जोडला नाही. त्यामुळे वापराविना या विहिरीचे पाणीदेखील हिरवे होऊन दूषित झाल्याने पाणी पिण्यायोग्य तर सोडाच वापरण्यासाठीसुद्धा उपयोग होणार नाही, अशी अवस्था झाली आहे. याविषयी गुंजी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व भालके गावचे नागरिक सुभाष घाडी यांनी ग्रा. पं. अध्यक्ष संतोष गुरव यांना पाणीटंचाईबद्दल माहिती देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर या विहिरीतील पाणी त्वरित उपसा करून विहीर स्वच्छ करून द्यावी, अशीही मागणी केली. पाहणीनंतर संतोष गुरव यांनी तातडीने या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. वास्तविक या विहिरीपर्यंत विद्युतखांब घालून विद्युतजोडणीही करण्यात आली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी विद्युतपंप न बसविल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याअभावी मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याविषयी याआधीही येथील ग्रामस्थांनी तालुका पंचायतमध्येही तक्रार दाखल केली आहे, असे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. मात्र अद्यापही याचे निराकारण झाले नसल्याने येथील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

भालके पंचायत सदस्यपद रिक्त

भालके गावच्या पंचायत सदस्या मयत झाल्याने हे पंचायत सदस्यपद वर्षभरापासून रिक्त झाले आहे. त्यामुळे भालके गावाला वाली नसल्याने या गावाकडे पंचायतीने साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळेच येथील नागरिकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. गावामध्ये जलजीवन योजनेमधून गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेले काम देखील अर्धवट स्थितीत असून या कामामुळेही नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तरी वरिष्ठांनी याची दखल घेऊन या गावासाठी त्वरित पंचायत सदस्याची निवड करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी आग्रही मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.