हल्याळ तालुक्यातील 80 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई
आतापासूनच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी तालुका प्रशासनाकडून प्रयत्न
हल्याळ : हल्याळ तालुक्यातील 80 टक्के गावांमध्ये आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दूरवर असलेल्या ओढ्यावर, शेतातील कूपनलिकांवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. काही विहिरी व कूपनलिकांचे पाणी अटल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. गेल्या 20 दिवसांपासून तीव्र पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. हल्याळ तालुका प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी दिवस-रात्र एक करत आहे, असे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. सध्या हल्याळ तालुक्यातील काही कूपनलिका पूर्ण अटल्याने गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. 20-25 दिवसांपूर्वी घरपोच मिळणारे पाणी आता बंद झाले आहे. ज्या-ज्या गावात पाणी समस्या निर्माण झाली आहे, अशा गावातील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
हल्याळ तालुक्यात 109 खेडी
हल्याळ तालुका सध्या नगदी पीक असलेले ऊस, कापूस व मक्का लागवड मोठ्याप्रमाणात घेत आहे. भात व इतर पारंपरिक कडधान्ये लागवड क्षेत्र फारच कमी झाले आहे. हल्याळ तालुक्यात 20 ग्राम पंचायती असून सरकारी नोंदप्रमाणे 109 गावे आहेत. या सर्वच गावांना कमी अधिक प्रमाणात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या 109 गावांपैकी भागवती, बी. के. हळ्ळी, अरलवाड, अडके होसूर, गवळीवाडा, ताटगेरा गवळीवाडा, अल्लूर, सातमनी, जावळी, बाणसगेरी, चिपलगेरी, जोगणकोप्प, हवगी, कवलकट्टा, सातमनी गवळीवाडा, तिम्मापूर, मलवडी, होस हडलगी, तट्टीगेरा, होसविटनाळ, गुंडोळी या 20 हून अधिक गावात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. या पुढील 15-20 दिवसांत 50 हून अधिक गावात पाणी समस्या वाढणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने पाण्याचे टँकर तयार ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
हल्याळ तालुक्यात दरवर्षी पाणीसमस्या निर्माण होत आहे. मार्च महिन्यातच ही समस्या आल्याने शेतकरी कासावीस झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पीडीओ व हल्याळ तहसील कार्यालयास संपर्क करून आपापल्या गावातील समस्या मांडत आहेत. पुढील दोन महिने कसे सामोरे जावे याची चिंता सतावत आहे. या भागाचे विद्यमान आमदारांनी गेल्या एक महिन्यापासून ज्या-ज्या गावात पाणी समस्या आहे याची आगाऊ माहिती घेऊन सद्या 50 लाख रुपये पाण्यासाठी मंजूर करून घेतले आहेत. तसेच दांडेली व जोयडा तालुक्यालाही प्रत्येक 50 लाख रुपये मंजूर केल्याने पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. याशिवाय हल्याळ तालुका, प्रशासनाने यापूर्वीच कंबर कसली आहे. पाणी सुरळीत उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक गावात कूपनलिका खोदण्याचे काम हाती घेतले आहे.
सरकारकडून निधी मंजूर
हल्याळ तालुक्यातील पाणी समस्येचा अहवाल सरकारला यापूर्वीच सादर केला आहे. सरकारकडून यासाठी निधी मंजूर झाला आहे. आर. व्ही. देशपांडे यांनी याकडे विशेष लक्ष दिले आहे. यामुळे कामांना गती आली असून तालुक्यातील 50 शेतकऱ्यांच्या खासगी विहिरीतून पाणी घेण्याचा करार करून त्यांना प्रती महिना 10 हजार रुपये भाडे देण्याचा करार झाला आहे.
- तहसीलदार आर. एच. बागवान