For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंजीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

10:54 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुंजीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई
Advertisement

चार दिवसाआड पाणी पुरवठा : पाण्यासारखा पैसा वापरुनही नियोजनाचा अभाव, महिलावर्गाचे हाल

Advertisement

वार्ताहर/गुंजी

गुंजीत मुबलक पाणीसाठ्याचे स्त्राsत असूनही आणि पाणीपुरवठ्यासाठी पाण्यासारखा पैसा वापरूनही केवळ गुंजी ग्राम पंचायतीचे आडमुठे धोरण आणि नियोजनाअभावी ऐन पावसाळ्dयातही गावात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने गुंजीतील नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वास्तविक गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठी गावाच्या पूर्वेला एक, दक्षिणेला एक आणि पश्चिमेला एक विहीर अशा तीन मोठ्या विहिरी आहेत. त्यांना सात ते दहा अश्वशक्ती क्षमतेच्या मोटारी जोडण्यात आल्या असून त्याद्वारे येथे उभारण्यात आलेल्या मोठ्या जलकुंभामध्ये पाणीसाठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता जवळजवळ सरकारकडून 80 ते 90 लाखाचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर जलजीवन योजनेअंतर्गत 30 लाखापैकी पुन्हा 15 लाखांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर गावामध्ये आठ ते नऊ कूपनलिका खोदाई करण्यात आल्या असून त्या ठिकाणीही सिंगल फेज मोटारी बसविण्यात आल्या आहेत. म्हणजेच जवळजवळ कोटी ते दीड कोटी रुपये केवळ पाण्यासाठी पाण्यासारखे खर्च करूनही केवळ नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे गावात दररोज पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

जलकुंभाचीही दुरवस्था

ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे येथे उभारण्यात आलेल्या जलकुंभाचीही दुरवस्था झाली असून जलकुंभांच्या स्वच्छतेअभावी आणि वापराविना सदर जलकुंभ कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. वास्तविक या जलकुंभामध्ये पाणीसाठा करून ठेवल्यास गावामध्ये वीज नसतानाही पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो, अशी योजना आहे. मात्र पंचायतीने या सर्व जलकुंभाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील जलकुंभ शोभेची वस्तू ठरत आहेत.

400 हून अधिक घरगुती नळजोडणी 

गुंजी गावात जवळजवळ 400 हून अधिक घरगुती नळजोडणी असून 35 ते 40 ठिकाणी सार्वजनिक लहान पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र ग्राम पंचायतीने पाणीपुरवठा नियोजनासाठी गावातील केवळ एक कर्मचारी आणि बाहेरील एक कर्मचारी अशा दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गावातील गल्लीत टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाते. त्यामुळे या ठिकाणी तीन ते चार दिवसानंतरच पाणी मिळते. या काळात जर लाईट, तांत्रिक व्यत्यय किंवा बिघाड झाला तर यापेक्षा अधिक दिवसही पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलावर्गातून सांगण्यात येत आहे.

गावातील कर्मचारी नियुक्तीची गरज

कैकवेळा दिवसा वीजपुरवठा खंडित होतो. रात्री वीजपुरवठा कार्यान्वित झाल्यावर बाहेरगावचा पाणी सोडणारा कर्मचारी नसल्याने पुन्हा पाण्यासाठी दुसऱ्या दिवशीची वाट पहावी लागते. त्यामुळे गुंजी गावातीलच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. कारण याआधी गावातील कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. मात्र त्याच्या अकाली मृत्युमुळे ही जागा अद्याप रिक्त आहे. तरी पंचायतीने सारासार विचार करून जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून दररोज किंवा दिवसाआड पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.