शहरातील 25 हॉटेल्समधील पाण्याचे नमुने ताब्यात
महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून तपासणी
बेळगाव : बेळगावात 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनानिमित्त मंत्री आणि अधिकारी शहरातील विविध हॉटेल्समध्ये वास्तव्य करणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याची सूचना मनपा आयुक्त शुभा बी. यांनी आरोग्याधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे व त्यांचे सहकारी विविध हॉटेल्सना भेटी देऊन तेथील पाण्याचे नमुने चाचणीसाठी ताब्यात घेत आहेत. शहरातील 80 हॉटेल्समधील पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार असून सोमवार दि. 2 रोजी पहिल्या दिवशी 25 हॉटेल्समधील पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन ते जिल्हा सर्वेक्षण अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले. कर्नाटक सरकारचे विधिमंडळाचे अधिवेशन 9 डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्णविधानसौधमध्ये सुरू होणार आहे.
अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, त्याचबरोबर विविध खात्यांचे अधिकारी बेळगाव येथील विविध हॉटेल्समध्ये वास्तव्य करणार आहेत. या काळात मंत्रिमहोदय आणि अधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वीच शहरातील हॉटेल्स मालकांची बैठक घेऊन अधिवेशन काळात कोणतेही बुकिंग घेऊ नये, सर्व खोल्या आरक्षित ठेवण्यात याव्यात, अशी सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. त्याचबरोबर हॉटेल्समधील आहाराची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्याची सूचनाही केली होती. त्यानंतर आता महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी मनपाच्या अखत्यारित येणाऱ्या हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीची सूचना केली आहे.
त्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे व आरोग्य निरीक्षक विविध हॉटेल्सना भेटी देऊन त्याठिकाणी ग्राहकांना देण्यात येणारे कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्याचे नमुने चाचणीसाठी ताब्यात घेत आहेत. शहरातील एकूण 80 हॉटेल्समधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले जाणार असून पहिल्याच दिवशी 25 हॉटेल्समधील पाण्याचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी व्हॅक्सिन डेपो येथील जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले. पाणी गुणवत्तेचा अहवाल आल्यानंतर संबंधित हॉटेल्स चालकांना त्याची कल्पना दिली जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी शहरात फेरफटका मारून विविध हॉटेल्सना गाठीभेटी देत आहेत. टप्प्याटप्प्याने शहरातील 80 हॉटेल्समधील पाण्याचे नमुने तपासले जाणार असून यापुढे हॉटेल चालकांना पिण्यायोग्य पाणी ग्राहकांना उपलब्ध करून देणे गरजेचे असणार आहे.
उर्वरित हॉटेल्समधील पाण्याचे नमुने टप्प्याटप्प्याने घेणार
विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 80 हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी शहरातील 25 हॉटेल्समधील पाण्याचे नमुने ताब्यात घेऊन ते जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. उर्वरित हॉटेल्समधील पाण्याचे नमुने टप्प्याटप्प्याने घेतले जातील.
- डॉ. संजीव नांद्रे, आरोग्याधिकारी महापालिका