For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी दहा दिवस हिडकलमधून पाणी

06:53 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी दहा दिवस हिडकलमधून पाणी
Advertisement

मंत्री सतीश जारकीहोळी यांचा आदेश

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी जीएलबीसी व जीआरबीसी कालव्यामध्ये पुढील दहा दिवस पाणी सोडण्याचा आदेश मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. त्यांचे स्वीय साहाय्यक शिवू पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशावरून हिडकल जलाशयातून दोन्ही कालव्यांना 24 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. आता आणखी दहा दिवस कालव्यांना पाणी सोडण्याचा आदेश सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे.

सतीश जारकीहोळी यांनी या परिसराला स्वत: भेट देऊन जीएलबीसी व जीआरबीसी (घटप्रभा उजवा व डावा कालवा) कालव्यांची पाहणी केली आहे. कोळवीपासून 32 किलोमीटर अंतरावर गळती लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 1 टीएमसीपैकी अर्धा टीएमसी जीआरबीसी कालव्याला व अर्धा टीएमसी सीबीसी चिकोडी उपकालव्याला सोडण्यास सांगितले आहे.

उंचावरील बेटगेरी, ममदापूर व गोकाकमधील शेतकऱ्यांनी कौजलगी, यादवाड, गद्दलकेरी येथील शेतकऱ्यांना पाण्याचा सदुपयोग करण्यास सहकार्य करावे. दहा दिवसांमध्ये उंचावरील शेतकऱ्यांसाठी सहा दिवस व उतरतीवरील शेतकऱ्यांसाठी चार दिवस पाणी सोडण्याची सूचना सतीश जारकीहोळी यांनी दिली असून शेतकऱ्यांनी पाण्याचा सदुपयोग करण्याचे आवाहनही केले आहे.

Advertisement

.