कोल्हापुरात पाणी महागणार, पाणीपट्टीत साडेपाच टक्के वाढ; सरासरी ११० ते १२० रुपये वाढणार
कोल्हापूर: महापालिकेने गेल्या सभेत घेतलेल्या निर्णयानुसार पाणीपट्टीत साडेपाच टक्के वाढ केली आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. पाणीपट्टीत पूर्वीच्या ४ स्लॅबऐवजी ६ स्लॅब करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे, अशी माहिती महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.
दरम्यान, गणेशोत्सवानंतर अवैध नळ कनेक्शनधारकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्त डॉ. भारूड यांनी दिला. महापालिकेत महापौरांच्या दालनात गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेला महापौर निकम, आयुक्त डॉ. भारूड, सभागृहनेते मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक आस्किन आजरेकर, जलअभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते.
आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, मनपा प्रशासनाने १ जुलैपासून पाणीपट्टीत सुधारणा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. त्यावर स्थायी समितीने १२ जूनला शिफारस करून तो महापालिकेच्या सभेत ठेवला होता, त्यावर चर्चा होऊन पाणीपट्टी दरवाढीला मंजुरी मिळाली. यापूर्वी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासक काळात २०२१ मध्ये आला होता. त्यावेळी १ एप्रिल २१ पासून दरामध्ये सुधारणा प्रस्तावित होती. पण प्रशासक काळ संपल्यानंतर तो पुढे आला. यामध्ये ० ते २० हजार लिटरपर्यंत द्वैमासिक ९.५० रूपये स्थिर आकार होता. त्यात वाढ केली आहे. तो १५ रूपये केला आहे. स्थिर आकारात साडेपाच रूपये वाढ झाल्याचे सांगितले.
महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या, पाणी विभागाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत. महापालिकेचे पाणीपट्टी दर खूपच कमी आहेत. जीवन प्राधिकरणापेक्षा खूपच कमी आहेत. त्यामुळे पाण्याची निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे आहे. त्यासाठी सभागृहात सर्वानुमते दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी पट्टीत हजार लिटरमागे साडेपाच रूपये दरवाढ केली आहे. पूर्वी प्रति हजार लिटरमागे ९.५ रूपये होते ते आता १५ रूपये होणार आहेत. १ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या सभेत पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. प्रशासनाच्या दराला मान्यता न देता महापौर आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी पूर्वीपेक्षा साडेपाच रूपयांनी दरवाढीला मान्यता दिली. त्यामुळे घरगुती नळकनेक्शनसाठी प्रति हजार लिटरमागे ९.५ ऐवजी १५ रूपये लागणार आहेत. दर महिन्याला घरटी ११० ते १२० रूपयांची बिलात सरासरी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापौर निकम यांनी दिली.
बोगस कनेक्शन सापडणार
आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, पाणी वापराची माहिती मिळण्यासाठी ऑटोमेशन केले जाणार आहे. त्यासाठी नवा डीपीआर तयार केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत तो सादर केला जाणार आहे. त्यात वॉर्डनिहाय पाणी वापराची माहिती मिळणार आहे. तसेच अवैध कनेक्शनधारकांना २५ हजार रूपयांपर्यत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
नव्या डीपीआरचा ४० कोटींचा आराखडा
जलअभियंता हर्षजित घाटगे म्हणाले, पूर्वीची योजना बनवताना लोकसंख्या पाहता आता ८ लाख लोकसंख्येला आपण पाणी देत आहोत. पण नव्या डीपीआर नंतर चोरी होणारे पाणी थांबणार आहे. त्यासाठी ४० कोटींचा आराखडा बनवला आहे. त्याला मंजुरी मिळताच हे काम सुरू होईल.
२० ते ४० हजार लिटरमध्ये २ स्लॅबवर आकारणी
आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावावर विचार करून सभागृहाने जनहितासाठी आराखडा तयार केला आहे. प्रस्तावाप्रमाणे प्रतीवर्षी ५० कोटी रूपये पाणीपट्टी वाढण्याची शक्यता होती. परंतु सभागृहाच्या मान्यतेनुसार ३० कोटी रूपये जमा होणार आहेत. घरगुती वापरासाठी यापूर्वी २० हजार ते ४० हजार लिटर पाणी वापराचा एक स्लॅब होता, तेथे २ स्लॅब केले आहेत, यामध्ये २० हजार ते ३० हजार लिटर आणि ३० हजार ते ४० हजार लिटर वापर असे २ स्लॅब केले आहेत. त्यानुसार १५ आणि ३० रूपये वाढ केली आहे. हजार लिटरमागे साडेपाच रूपये वाढवल्याने आता १५ रूपये होणार आहे.