For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जलवाहिन्या 40 वर्षांपूर्वीच्या, 24 तास पाणी कसं मिळणार?

01:06 PM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
जलवाहिन्या 40 वर्षांपूर्वीच्या  24 तास पाणी कसं मिळणार
Advertisement

पेयजलमंत्री फळदेसाई यांनीच व्यक्त केली अडचण

Advertisement

पणजी : राज्यात गेल्या 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या आजही कार्यरत आहेत. त्यामुळे घरातील नळांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. काही ठिकाणी तर जुन्या जलवाहिन्यांमुळे पाण्याची गळती होते आणि त्यातच जनतेला 24 तास पाणीपुरवठा होऊ शकत नाही, असे खुद्द पेयजल खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांसमोर अडचण व्यक्त केल्याने 24 तास पाणी मिळणार कसं? हा प्रश्न आवासूनच उभा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी शासकीय निवसस्थानी भेट घेऊन झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, राज्यात पाणीपुरठ्याबाबत मोठे संकट आहे. जुन्या पायाभूत सुविधांचे मोठे आव्हान असल्यामुळे आज 24 तास पाणीपुरवठा होऊ शकत नाही. राज्यातील केवळ 26 टक्के जनतेलाच 24 तास पाणीपुरवठा होतो.

उर्वरित लोकांना मर्यादित पाणीपुरवठ्यावर समाधान मानावे लागते. घरोघरी पाणीपुरवठा करणाऱ्या 50 टक्के जलवाहिन्या 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या असल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. 24 तास पाणी पुरवठा व्हावा, यासाठी सरकार आग्रही आहे. त्यासाठी सरकारने सकारात्मक प्रयत्न सुरू केलेले आहेत. पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या एप्रिलपर्यंत 100 एमएलडी क्षमतेचा नवीन प्रकल्प कार्यान्वित होईल. या प्रकल्पामुळे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा आशावादही पेयजलमंत्री फळदेसाई यांनी पत्रकारांकडे बोलताना व्यक्त केला. ज्या भागात पाण्याचा मुबलक पुरवठा होतो, तेथील नागरिकांनी पाण्याची नाशाडी करू नये. गरजेपुरते पाणी वापरून इतर लोकांचाही विचार करायला हवा. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत जुन्या जलवाहिन्यांच्या दुऊस्तीचे आणि नवीन प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर निश्चितच पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा होईल, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

Advertisement

स्वस्तात मिळणाऱ्या पाण्याचा दुऊपयोग नको

पाणीपुरवठा विभाग हा लोकांची तहान भागविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पाणीपुरवठा विभागाला आर्थिक तोटा होत असूनही ते जनतेला पाणी पुरवण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. सरकारला पाण्याचे एक युनिट तयार करण्यासाठी साधारणत: 30 रुपये इतका खर्च येतो. नागरिकांना हेच पाणी केवळ 4.10 रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या स्वस्तात मिळणाऱ्या पाण्याचा दुऊपयोग जनतेने करता कामा नये, पाणी जपून आणि गरजेपुरते वापरल्यास काहीप्रमाणात पाणी समस्या कमी होऊ शकते, त्याचा जनतेनेही विचार करायला हवा, असे पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.

Advertisement
Tags :

.