आदर्शनगर महालक्ष्मी कॉलनीतील जलवाहिनीला गळती
मनपासह एलअॅण्डटी कंपनीचे दुर्लक्ष
बेळगाव : आदर्शनगर येथील महालक्ष्मी कॉलनी सहावा क्रॉस येथे गेल्या 15 दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असले तरीही लिकेज काढण्याकडे महापालिका व एलअॅण्डटीने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या शहर व उपनगरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याचे दिसून येत आहे. मात्र लिकेज काढण्याकडे डोळेझाक केली जात असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. सध्या शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअॅण्डटी कंपनीवर आहे. त्यांच्याकडून 24 तास पाणी योजनेसाठी गल्लीबोळात खोदकाम करून जलवाहिन्या घातल्या जात आहेत. पण जलवाहिन्यांची गळती काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आदर्शनगर महालक्ष्मी कॉलनी सहावा क्रॉस येथे दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली होती. त्यापैकी एका ठिकाणची गळती काढण्यात आली आहे. तर नजीकच्याच दुसऱ्या गळतीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असल्याने आश्चर्य व्यक्त पेले जात आहे.