वाळू उपसामुळे मलप्रभा नदी-नाल्यांचे पाणी गढूळ
गढूळ पाण्याविरोधात तहसीलदार-जिल्हाधिकाऱ्यांकडे शेडेगाळी येथील रहिवासी तक्रार करणार
खानापूर : तालुक्यात बेकायदा वाळू उपसामुळे मलप्रभा नदीसह नाल्यांचे पाणी पूर्णपणे गढूळ झाले असून, या पाण्याचा वापर करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. मात्र याकडे पोलीस, महसूल खाते आणि भूगर्भ खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच शेडेगाळी येथील रहिवाशांनी गढूळ झालेल्या पाण्याविरोधात तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे तरुण भारतशी बोलताना सांगितले.
अवैद्य वाळू उपसाच्या पाण्यामुळे मलप्रभा नदीला मिळणाऱ्या नाल्यांचे पाणी पूर्णपणे गढूळ झाले आहे. तसेच हे पाणी मलप्रभा नदीत मिसळत असल्याने मलप्रभा नदीचे पाणी पूर्णपणे गढूळ आणि दूषित झाले आहे. वाळू उपसाच्या मळीमुळे संपूर्ण पाणी गढूळ होऊन जाडसर झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तसेच जनावरेही हे पाणी पित नसल्याने जनावरांच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. बेसुमार होत असलेल्या वाळू उपसामुळे याचा परिणाम पर्यावरणावरही झाला आहे. काही नाल्यांचे पात्रही पूर्णपणे बदलले आहे. ग्रामीण भागातील जेजेएम योजनेचा पाणीपुरवठाही ठप्प झालेला आहे.
शेडेगाळीचा पाणीपुरवठा बंद केल्याने मोठी गैरसोय
शेडेगाळी येथील हलात्री नदीत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी मिसळल्याने संपूर्ण पात्रच गढूळ झाले आहे. हलात्री नदीतून शेडेगाळी गावाला जेजेएम योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र पाणी गढूळ आणि जाडसर झाल्याने शेडेगाळी गावचा पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेडेगाळी गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेडेगाळी येथील ग्रा. पं. सदस्य रमेश चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव यांनी तरुण भारतशी बोलताना म्हणाले की, वाळू व्यावसायिकांनी नदीचे पाणी गढूळ न करता आपला व्यवसाय करावा, मात्र नदीचे पाणी गढूळ झाल्यामुळे याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झालेला आहे. वेळोवेळी सूचना करुनही वाळू व्यावसायिकांनी पाणी गढूळ होऊ नये, यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. यासाठी आम्ही आता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांसह संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे पाण्याचे नमुने घेऊनच लेखी तक्रार करणार आहोत. असे सांगितले.
अवैद्य वाळू उपसावर तातडीने बंदी आणा
शासनाकडून वाळू उपसावर निर्बंध घालण्यात आले असले तरी, तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य वाळू उपसामुळे निसर्गावर परिणाम होत आहे. मलप्रभेचे पात्रात गेल्या काही दिवसांपासून वाळू उपशामुळे मळमिश्रित पाणी सोडल्याने मलप्रभेचे पात्रही दूषित झाले आहे. याचा परिणाम दिसून येत आहे. मणतुर्गा, शेडेगाळी, खानापूरसह इतर गावातील मलप्रभेच्या पात्रात मिसळणाऱ्या या गढूळ पाण्यामुळे संपूर्ण नदी पात्रच गढूळ झाले आहे. यासाठी संबंधित खात्याने गांभीर्याने अवैद्य वाळू उपशावर तातडीने बंदी आणावी अशी मागणी होत आहे.