For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात साकारणार ‘वॉटर मेट्रो’

08:20 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात साकारणार ‘वॉटर मेट्रो’
Advertisement

केंद्रीय जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची माहिती: कॅप्टन ऑफ पोर्टसच्या टर्मिनलचे शानदार उद्घाटन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी : गोवा राज्यासाठी ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्प मंजूर करण्याची प्रक्रिया पहिल्या टप्प्यावर आणण्यात आली असून ती मागणी मान्य झाली आहे. मुरगांव बंदर प्राधिकरणात (एमपीए) विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार रु. 2 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केंद्रीय जहाज बांधणी, बंदर व जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केली आहे.

Advertisement

कॅप्टन ऑफ पोर्टसच्या (बंदर कप्तान खाते) नवीन टर्मिनलचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, गोव्यासाठी वॉटर मेट्रो प्रकल्प मान्यतेसाठी शेवटच्या टप्प्यावर होता, पण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यासाठी मागणी केल्यानंतर तो प्रकल्प पहिल्या टप्प्यावर आणला गेला आहे. हा प्रकल्प अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्याने हातात घेण्यात येणार असून गोव्याची मागणी मान्य करण्यात आल्याचे सोनोवाल यांनी पुढे सांगितले.

 गोवा ठरले पहिले राज्य

गोवा राज्याने अंतर्गत जहाज कायदा - 2021 ची देशात प्रथम कार्यवाही केली असून ते देशातील पहिले राज्य ठरले आहे. मरीटाईम बोर्ड, गोवा जहाज दुरुस्ती - बांधणी धोरण आणि त्यासाठीचा आराखडा यातून गोव्यातील भवितव्याचे चित्र स्पष्ट होते. वॉटर मेट्रो प्रकल्पाची मागणी करुन गोव्यासाठी नवीन वाहतूक व्यवस्था तयार करणे गरजेचे आहे. म्हणून कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर गोव्यात सदर प्रकल्पास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची तयारी असल्याचे सोनोवाल यांनी नमूद केले.

 विकासप्रकल्पांना  विरोध नको : कामत

बंदर कप्तानमंत्री दिगंबर कामत यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करताना गोवा राज्यासाठी मरिटाईम बोर्डाची स्थापना 30 सप्टेंबर 2026 या मुदतीपूर्वी करणार असल्याचे सांगितले. एकूण 4400 चौ. मी. क्षेत्रात ही इमारत साकारण्यात आली असून रु. 48 कोटी खर्च झाले आहेत. अत्याधुनिक व आयकॉनिक इमारत असून विकास प्रकल्पांना कोणी विरोध करु नका, असे आवाहन त्यांनी केले.

कॅप्टन ऑफ पोर्टसच्या नवीन इमारतीच्या हॉलमध्ये उद्घाटन सोहळा झाला. यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार मायकल लोबो व संकल्प आमोणकर, खासदार सदानंद तानावडे, पणजीचे महापौर रोहीत मोन्सेरात, एमपीएचे अध्यक्ष विनोद कुमार अशा मान्यवर मंडळीची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्वांना शाल आणि फळ-फुलांची परडी देऊन सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सोनोवाल यांनी तांबडी फीत कापून आणि तळमजल्यावर समई प्रज्वलित करुन नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. बोटीच्या आकाराची ही नवीन वास्तू आकर्षक असून पणजीहून मिरामारला जाताना उजव्या बाजूला असलेल्या मांडवी किनारी साकारण्यात आली आहे. ती लक्ष वेधून घेते.

एमपीएला केंद्राकडून मिळणार 2 हजार कोटी

गेल्या 10 वर्षात एमपीएने भरीव कामगिरी केली असून रु. 1300 कोटीचे विविध प्रकल्प पूर्ण केले आहेत. आता नवीन मच्छीमारी हार्बर, बर्थ - 9 चा पुनर्विकास, वास्को बे प्रकल्प, शिपर्याड क्लब, गाळ काढण्याचा प्रकल्प इत्यादी विविध कामांसाठी रु. 2 हजार कोटी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सोनोवाल यांनी दिली. एमपीएने देशातील पहिले हरित बंदर म्हणून मान मिळवून एwतिहासिक नोंद केल्याचे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.