For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ

06:45 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ
Advertisement

जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास अजूनही साडेचार फूट पाण्याची आवश्यकता

Advertisement

त. भा. वार्ताहर

तुडये

Advertisement

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी शुक्रवारी सकाळी एक फुटाने वाढ होत 2469.80 फूट इतकी झाली. तर सायंकाळी यामध्ये अर्धा फुटाने वाढ होत पाणीपातळी 2470.30 फुटावर पोहोचली आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास अजूनही साडेचार फूट पाण्याची आवश्यकता आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात जलाशय पाणीपातळी पूर्ण होणार आहे.

शुक्रवारी सकाळी 27.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर एकूण 1241.0 मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी पाणीपातळी ही 2472.70 फूट इतकी होती तर एकूण पाऊस 1865.5 मि.मी. इतका झाला होता. मागील वर्षापेक्षा 4 फूट पाणी कमी आहे तर पाऊस 624.5 मि.मी. कमी झाला आहे.

जुनी पाणीपातळी पूर्ण

सन 1963 साली उभारण्यात आलेल्या या जलाशयाची पाणीपातळी ही 2470 फूट इतकी होती. ती 1980 सालापर्यंत तशीच होती. 1980 साली प्रथम मार्कंडेय नदीतून वाहून जाणाऱ्या पाण्याला सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यातून माती भरून त्याचा बांध बांधत तीन फूट पाणी साठविण्याची पद्धत 1984 सालापर्यंत करण्यात आली. बेळगाव शहर आणि उपनगरातील पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करता शहर पाणीपुरवठा मंडळाने 1985 साली मार्कंडेय नदीला सहा वेस्ट वेअरचे दरवाजे उभारत पाणीपातळी 2475 फुटापर्यंत वाढली. शुक्रवारी दुपारी वेस्ट वेअरच्या दरवाजांकडे पाणी वाहू लागल्याने जलाशयाने जुनी पातळी पूर्ण केली आहे. आता केवळ साडेचार फूट पाणी भरणे बाकी राहिले आहे. जलाशयाला मिळणाऱ्या मार्कंडेय नदीपात्र, जांभूळ ओहळ नाला पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने पाण्याचा ओघ जलाशयाकडे वाढला आहे. वेस्ट वेअरच्या दरवाजांच्या खालून रबरी पॅकिंगमधून गळणारे पाणी आता मर्कंडेय नदीतून दुपारपासून प्रवाहाने वाहू लागले आहे.

खात्याकडून गंगापूजन सोहळा

जलाशयाने आपली जुनी 2470 फुटाची पाणीपातळी पूर्ण केल्यानंतर गंगापूजन पाणीपुरवठा मंडळाकडून करण्यात येतो. शुक्रवारी दुपारी कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी, जलाशय अधिकारी प्रवीण सायनेकर यांच्यासह जलाशयाकडील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गंगापूजन करण्यात आले.

Advertisement
Tags :

.