महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विसर्ग वाढला,सतर्क रहा

12:06 PM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /एकसंबा

Advertisement

पाणलोट क्षेत्रात पावसाच्या कोसळधारा बरसतच असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढच होत चालली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे पूरसदृश स्थिती निर्माण होत असून नदीकाठच्या गावातील नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. तसेच पाणलोट क्षेत्रातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे.  महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याची आवक जास्त होत असल्याने आलमट्टी धरणातून बुधवारी सकाळी 9 वाजता दोन लाख क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Advertisement

चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीत गेल्या 24 तासात 0.63 मीटर इतकी पाणीपातळी वाढली आहे. तर दूधगंगा नदीची पाणी पातळी 0.31 मीटर इतकी वाढली आहे. राजापूर बंधाऱ्यातून 1 लाख 35 हजार 835 क्युसेक, दूधगंगा नदीतून 32 हजार 730 क्युसेक असा एकूण 1 लाख 68 हजार 565 क्युसेक प्रवाह कल्लोळ कृष्णा नदीत येत आहे. कृष्णा व दूधगंगा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना नदीच्या पाण्यात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाणलोट क्षेत्रातील धुवाधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे कोयना धरणातून 1050 क्युसेक, वारणा धरणातून 8874 क्युसेक, तर राधानगरी धरणातून 1500 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. राधानगरी धरण 93 टक्के भरले असून पावसाची संततधार कायम राहिल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे. सध्या आलमट्टी धरणात 91.928 टीएमसी पाणीसाठा असून 75 टक्के धरण भरले आहे. धरणात 1 लाख 14 हजार 445 क्युसेक पाण्याची आवक होत असून 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन कर्नाटक व महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची सद्यस्थितीबाबत चर्चा झाली. कोयना, महाबळेश्वर, वारणा, राधानगरी यासह इतर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यापुढील काळात केवळ पावसाचे नव्हे तर धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढणार आहे. पावसासोबतच धरणातील पाण्यामुळे नद्या आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

दूधगंगा नदीकाठाला सतर्कतेचा इशारा

निपाणी शहर व परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्याचबरोबर राधानगरी परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले जाणार असून यामुळे दूधगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील जनतेने सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी केले आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणाच्या विद्युतगृहातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पाटबंधारे खात्याच्या कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून उपलब्ध झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article