Kolhapur News: कळंबा तलावाची पाणीपातळी तेरा फुटांवर; गावासमोर टंचाईचे संकट
कळंबा तलावातील घटलेली पाणीपातळी आणि हिरवट झालेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता
कळंबा : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना कळंबा तलावाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून गावासह परिसरातील नागरिकांसमोर पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. तलावातील पाणीपातळी सध्या केवळ तेरा फुटांवर आली असून, दररोज होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाणी उपशामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे. त्यातच तलावातील पाणी हिरवट होत असल्याने दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही त्यामुळे गंभीर बनला आहे.
सध्या कळंबा ग्रामपंचायतीकडून गावात दिवसाआड केवळ तीस मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वी नियमित होणारा पाणीपुरवठा आता कमी झाल्याने नागरिकांना पाण्याची साठवणूक करावी लागत आहे. अनेक घरांमध्ये पाण्याचे ड्रम, टाकी, भरून ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र दोन दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यात जाळी धरते, अळ्या तयार होतात, दुर्गंधी येते, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
कळंबा तलावातून सध्या ग्रामपंचायतीकडून सुमारे दीड एमएलडी, तर कोल्हापूर महानगरपालिकेकडून चार एमएलडी, असा एकूण साडेपाच एमएलडी पाणी उपसा दररोज होत आहे. कळंबा गावासाठी असलेला तलाव मात्र कोल्हापूर महानगरपालिका तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करत असल्याने तलावाची पाणीपातळी झपाट्याने खाली येत असल्याने येत्या काळात पाण्यासाठी धावा धाव होणार आहे शहरासाठी पर्यायी पाणीपुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध असताना कळंबा गाव मात्र तलावावरच पूर्णपणे अवलंबून आहे.
महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा योजना राबवली आहे. त्याच धर्तीवर कळंबा तलावातून होणारा पाणी उपसा नियंत्रित करून गावासाठी पुरेसा साठा राखावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा येत्या काही आठवड्यांत गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. उन्हाळा अजून शिल्लक असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
तलावातील पाणी हिरवट होण्यामागे पाणलोट क्षेत्रात वाढत असलेले प्लॉटींग, हॉटेल्स, मंगल कार्यालय, वाढते तापमान, यामूळे तलावाचे पाणी हिरवट आणि दुर्गंधीयुक्त असल्याने मिसळत असल्याने पाण्याला हिरवट पाना येत आहे. परिणामी पाण्याची गुणवत्ता खालावत असून त्याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून काही भागांत दुर्गंधीयुक्त हिरवट पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी पिण्यासाठी वेगळे पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे.
तलावाची पाणीपातळी आणखी खालावली तर दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, उलट्या-जुलाब, ताप, कावीळ, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि दूषित पाणीपुरवठा या दुहेरी संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी स्वच्छ पाणी अत्यावश्यक असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर ठरत आहे. तलावातील जलचरांच्या अस्तित्वासाठी किमान आठ फूट पाणीसाठा राखणे आवश्यक फक्त तलावातून पाच फुटच पाणिउपसा करावा लागणार आहे. मात्र सध्याची पाणीपातळी तेरा फुटांवर आल्याने पुढील काही दिवसांत ती आणखी खाली गेल्यास पर्यावरणीय संकटही निर्माण होऊ शकते. मासे, पक्षी आणि इतर जलचरांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीने महापालिकेला पत्राद्वारे निवेदन देऊन पाणीप्रश्न गांभीर्याने मांडला आहे. पर्यायी पाणीपुरवठा, समन्वय बैठकीची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आहे. दरवर्षी मार्चनंतर कळंबा गावात गाळयुक्त पाण्याच्या तक्रारी होत असतात. मात्र यंदा परिस्थिती अधिक बिकट झाली असून दुर्गंधीयुक्त हिरवट पाणीपुरवठा होत आहे. यावरून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तलावातील गाळ काढणे, प्रदूषण नियंत्रण, पाणी तपासणी आणि शाश्वत जलव्यवस्थापनाचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे.
महिलांवर या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम होत आहे. पाणी साठवणे, जपून वापरणे, कपडे धुणे, स्वयंपाक, घरातील स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसाआड पाणी येत असल्याने संपूर्ण घराचे वेळापत्रक बदलले आहे.
कळंबा तलाव हा गावाची जीवनवाहिनी असून त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. तलाव परिसरातील प्रदूषण रोखणे, गाळ काढणे, पाणी उपशाचे योग्य नियोजन करणे, पर्यायी जलयोजना राबवणे आणि ग्रामस्थांना नियमित माहिती देणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. उन्हाळा संपेपर्यंत तातडीच्या उपाययोजना आणि पुढील वर्षांसाठी दीर्घकालीन नियोजन हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कळंबा गावाच्या पाणीप्रश्नाबाबत महापालिकेला पत्राद्वारे निवेदन दिले आहे. तलावाची घटती पाणीपातळी आणि दूषित पाण्याचा प्रश्न गांभीर्याने मांडला आहे. लवकरच महापालिकेसोबत समन्वय बैठक घेऊन पर्यायी पाणीपुरवठा, टँकर व्यवस्था तसेच पुढील काळातील जलनियोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनीही पाणी जपून वापरावे. (सुमन गुरव, सरपंच कळंबा)
कळंबा तलावाची घटती पाणीपातळी लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन सुरू असून गावाला टंचाई जाणवू नये यासाठी सर्व सदस्य एकत्रितपणे काम करत आहेत. (पूनम जाधव सदस्या ग्रा. पं कळंबा)
तलावातील पाण्याच्या गुणवत्तेबाबतही ग्रामपंचायत गंभीर आहे. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण तपासणी, क्लोरीनेशन तसेच पर्यायी स्रोतांवर भर दिला जात आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आम्ही ग्रामपंचायत कटिबद्ध आहोत. (विलास राबाडे ग्रामविकास अधिकारी कळंबा)