लिंगनमक्की जलाशयातील पाण्याच्या पातळीने 1800 फुटाचा टप्पा ओलांडला
होन्नावर तालुक्यात शरावती नदीच्या तीरावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कारवार : राज्यातील प्रमुख जलाशयांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरावती नदीवरील लिंगनमक्की जलाशयातील पाण्याच्या पातळीने 1800 फुटाचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कारवार जिल्ह्यातील होन्नावर तालुक्यात शरावती नदीच्या तीरावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना कर्नाटक विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून लिंगनमक्की जलाशयाचे पाणलोट क्षेत्रातील कारवार आणि शिमोगा जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
जल उर्जा निर्मितीच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लिंगनमक्की जलाशयातील कमाल पाण्याची पातळी 1819 फूट इतकी झाली आहे. बुधवारअखेर ही पातळी 1801.75 फूट इतकी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही पातळी 19.50 फूट इतकी अधिक आहे. जलाशयात सुमारे 25 हजार क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे. जलाशय पाणलोट क्षेत्रात पावसाचा मारा सुरूच असून जलाशय तुडूंब भरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याकरिता होन्नावर तालुक्यात शरावती नदीच्या काठावर वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण लिंगनमक्कीतील विसर्गाचा थेट परिणाम होन्नावर तालुक्यातील अनेक खेड्यांवर होत असतो.
सुपा जलाशयातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ
जोयडा तालुक्यातील काळी नदीवरील सुपा (गणेशगुढी) जलाशयातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या जलाशयातील कमाल पाण्याची पातळी 564 मीटर इतकी असून बुधवारअखेर ही पातळी 545.62 मीटर इतकी झाली आहे. सुपा जलाशयात 2 हजार 565 क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे.
कद्रा जलाशयातून मोठा विसर्ग सुरूच
कारवार तालुक्यातील काळीनदीवरील कद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासात कद्रा धरण पाणलोट क्षेत्रात 110 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात 28 हजार क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काळी नदीच्या तीरावर (कारवार तालुका) वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांवर बारीक नजर ठेवून आहे. या जलाशयातील कमाल पाण्याची पातळी 34.50 मीटर इतकी असली तरी जिल्हा प्रशासनाकडून ही पातळी 30 मीटर इतकी निश्चित केली आहे.