गोगटे सर्कलनजीकची पाणीगळती दुरुस्त
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल : एलअँडटीकडून काम हाती
बेळगाव : शहरातील गोगटे सर्कलनजीक गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती. मुख्य रस्त्यावरून सतत पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्याच्या काळात हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. यासंदर्भात दैनिक ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सोमवारी एलअँडटी कंपनीकडून गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गोगटे सर्कल परिसर हा शहरातील महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा भाग मानला जातो. या परिसरातून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. दरम्यान, पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याचे समोर आले होते.
सुरुवातीला किरकोळ स्वरुपात असलेली गळती नंतर वाढत गेली आणि मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले. मुख्य रस्त्यावरून सतत पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणी निर्माण होत होत्या. मात्र एलअँडटी कंपनीचे कर्मचारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन संबंधित ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईनची तपासणी करण्यात आली. पाहणी करून दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नानंतर गळती थांबविण्यात यश आले. वेळेत दुरुस्ती झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाण्याची होणारी मोठी नासाडी थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तसेच भविष्यात विकासकामे करताना पाणी, वीज आणि अन्य भूमिगत वाहिन्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.